मुंबई : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर 2019 लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात सिद्धेश्वर महाराज यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर महाराज यांना भरघोस मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला. मात्र या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. याबाबत याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केली होती. कीर्तीकुमार शरण या सामाजिक कार्यकर्त्याकडून ही हस्तक्षेप याचिका दाखल झालेली आहे. त्या संदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकल सदस्य खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Solapur 2019 Lok Sabha election)
प्रतिज्ञापत्रात कबूली : न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापूर जिल्हाधिकारी अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी अनेक युक्तिवाद करत काही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले होते. त्यावेळी सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिटच्या आतमध्ये कोणतं सॉफ्टवेअर किंवा मशीन असतं, याची कल्पना नसल्याचं सांगितलं. परंतु मशीनमध्ये कोणत्याही छेडछाड केली गेली नाही, असा त्यांनी दावा केला. तसेच त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातील मतदानामध्ये थोडीफार तफावत आढळल्याचं नमूद केलं.
ईव्हीएम मशीनमध्ये बेकायदेशीररित्या घोटाळा : याचिकाकर्ते कीर्तीकुमार शरण म्हणाले की, मतदानामध्ये थोडाफार फरक आहे, असं प्रतिज्ञापत्रात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. याचाच अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली. त्यामुळंच 2019 सोलापूर लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये बेकायदेशीररित्या घोटाळा झाला असल्याचा त्यांचं म्हणणं आहे. न्यायालयाने सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्राचं वाचन केलं. त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये मतदानात तफावत आढळल्याचं म्हटलं. यावर आपण ठाम आहात का? असं विचारलं. यावर अधिकाऱ्यांनी यावर होकारार्थी उत्तर दिलं. परंतु ईव्हीएम मशीनच्या आतमध्ये असलेल्या तांत्रिक बाबीची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही पक्षकांची बाजू ऐकून घेतली. यासंदर्भात पुढील तपशीलवार सुनावणी 30 ऑगस्ट रोजी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :