मुंबई - कोरोना आणि मागील 2 आठवड्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई, नवी मुंबईत राहणाऱ्या बांधकाम आणि इतर विविध क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी एमजीडी या सामाजिक संघटनेच्या एका ग्रुपने पुढाकार घेतला आहे. ज्या ठिकाणी या कामगारांच्या वस्त्या आहेत, ज्यांना अजून मदत मिळाली नाही, अशा कामगारांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी मुंबईतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते अन्नधान्य वाटप करत आहेत. मागील काही दिवसांपासून हा कार्यक्रम सुरूच आहे. सरकारच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी दुर्बल घटकातील कामगार, उपेक्षितांना मदत देण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे सरसावला आहे.
मुंबईतील मानखुर्द पीएमजीपी जवळ असलेल्या दुर्गामाता चौक, ज्योतिलिंग नगर, अशोक नगर आदी परिसरात असलेल्या कामगारांना संस्थेकडून अन्नधान्य, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मानखुर्द वार्ड क्रमांक १२०, वार्ड १४२ जयहिंद नगर येथे २०० कुटुंबाला धान्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करुन त्यांना मदत पुरविण्यात आली. यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज फौंडेशनचे संचालक विकास तांबे, एमजीडी ग्रुपचे के. टी. यादव यांच्यासह अनेकांनी या मदतीसाठी आपले योगदान दिलेले आहे.