मुंबई- आरे जंगलात गेल्या १५ दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. न्यूझीलंड हॉस्टेल, रॉयल पाम्स अशा ठिकाणी सहा ते आठ आगीच्या घटना घडत आहेत. शिकार आणि अनधिकृत बांधकामाच्या हेतूने या आगी लावल्या जात असून वन विभाग आणि इतर संबंधित विभाग याविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप आदिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी केला आहे. तर या प्रकरणी वनशक्ती संस्थेने पर्यावरण विभाग आणि वन विभागाकडे तक्रार दाखल करत असे प्रकार रोखण्याची मागणी केली आहे.
या ठिकाणी लागताहेत आगीआरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी आणि आदिवासिंनी 'सेव्ह आरे' चळवळ सुरू केली आहे. कुठेही झाडे कापली जाऊ नये आणि अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यावर करडी नजर ठेवून आहेत. असे असताना आता आरेत आगीच्या घटना घडत आहेत. जंगलात नेहमीच वणवा, आगी लागतात. पण गेल्या १५ दिवसांतील लागलेल्या आगी या जाणीवपूर्वक लावण्यात आलेल्या असल्याचा आरोप प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. न्यूझीलंड हॉस्टेल, खांबाची पाडा, रॉयल पाम्स, युनिट नंबर २२ , तपेश्वर अशा ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. तर या आगी खूप मोठ्या असून यामुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार यासंबंधी तक्रार करूनही वन विभाग, पोलीस कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने या घटना वाढत असल्याचा आरोप दयानंद यांनी केला आहे.
बिल्डरचा हात? मागील 15 दिवसांपासून आरे जंगलात लागलेल्या आगी या मुद्दामून लावण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्देशाने जागा बळकावण्यासाठी ह्या आगी लावल्या जात असल्याचा आरोप ही स्टॅलिन यांनी केला आहे. आरेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे. मुंबईत आता मोकळ्या जागा शिल्लक नसताना आरेत मोठ्या प्रमाणावर रिकामी जागा आहे. त्यामुळे बिल्डरचा डोळा आरेवर आहे. कायद्याने बांधकाम करता येत नाही, म्हणून अशा आगी लावत येथे जागा मोकळी करून घ्यायची. येथे अनधिकृत बांधकामे करायची आणि मग हीच जमीन बळकवायची असा घाट बिल्डरांचा आहे. त्यामुळे येथे मोठ्या आगी लावल्या जात असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. दरम्यान ससा आणि इतर प्राण्यांच्या शिकारीच्या हेतून ही काही आगी लावल्या जात असून हा प्रकार घातक असल्याचेही ते म्हणाले.
बंद फायर स्टेशन सुरू करा
जंगलात नैसर्गिक आगीच्या घटना घडत असल्याने त्या ठिकाणी फायर स्टेशन असते. त्यानुसार आरे युनिट नंबर १ येथे ५०वर्षापासून फायर स्टेशन आहे. पण हे स्टेशन मागील १५ वर्षांपासून बंद आहे. या फायर स्टेशनमध्ये सद्या आधार कार्ड नोंदणीचे काम करण्यात येते. तेव्हा हे फायर स्टेशन पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आरेतील रहिवासी प्रकाश भोईर यांनी केली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे आग वाढते आणि मोठे नुकसान होते. त्यामुळे हे फायर स्टेशन त्वरित सुरू करावे अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आरे पोलीस वा सुरक्षा रक्षक ठेवावेत आणि या घटना रोखाव्यात. तर आग लावणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्टॅलिन यांनी केली आहे.