मुंबई - मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं 17 ऑगस्टला अमेरिकेतील न्यू जर्सी इथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताची कधीही भरुन येणार नाही अशी हानी झाली आहे. पंडितजी आपल्यातून गेले असले तरीही ते जिथे कुठे असतील तिथून कायम उत्तम संगीताला दाद देत राहतील, अशी प्रतिक्रिया भजन सम्राट अनुप जलोटा यांनी दिली आहे.
अनुप जलोटा यांनी पत्नी मेघा ही पंडित जसराज यांची शिष्या असल्याने पंडितजी कायम त्यांना आपले जावई समजत असत. एकमेकांबद्दल असलेले प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते त्यांनी आयुष्यभर जपल्याचे अनुप जलोटा यांनी सांगितले. पंडितजींची इहलोकातून देवलोकात जाण्याची यात्रा सुरू झाली आहे. मात्र, आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान कायम अबाधित राहील, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, आज दुपारी पंडित जसराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी अनुप जलोटा यांनी पत्नीसह त्यांचे अंत्यदर्शन घेतले. संगीत सूर्याला आदरांजली देण्याची ही संधी हातची जाऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत न्यू जर्सी येथे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले शास्त्रीय गायक होते. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने बुधवारी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. आज विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.