मुंबई - गरिबांना पोटभर अन्न मिळावे म्हणून शिवसेनेने राज्यात शिवथाळी योजना सुरू केली. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालय कँटीनमध्येही ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र परवडत नसल्याचे कारण देत ही योजना आता बंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यभर शिवथाळी योजना सुरू केली जात असताना पालिका मुख्यालयातूनच ही शिवथाळी गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डिसेंबरमध्ये प्रारंभ
मुंबई महापालिका मुख्यालय कॅन्टीनमध्ये कमी दरात खाण्याचे पदार्थ देण्याच्या अटीवर कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. चार वर्षांहून अधिक काळ 10 रुपयांत जेवणाची थाळी देण्याची अट कंत्राटादाराला घालण्यात आली होती. मोठा गाजावाजा करत डिसेंबर 2019मध्ये पालिका कॅन्टीनमध्ये शिवथाळी सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले होते. त्यानंतर फक्त काही दिवस ही योजना सुरू होती. नंतर मात्र शिवथाळी मागणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना परवडत नसल्याने ती बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.
सबसिडीसाठी प्रयत्न सुरू
मुंबई महापालिकेत कुठलीही सबसिडी मिळत नसल्याने शिवथाळी परवडत नव्हती. परंतु सबसिडी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच शिवथाळी सुरू करण्यात येईल, असे उपहारगृह चालकाकडून सांगण्यात आले.
गोरगरीबांची दिशाभूल
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून गरीबांच्या पोटाची भूक भागवावी यासाठी गाजावाजा करत मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात शिवथाळी योजना सुरू केली. या शिवथाळीचे दोन वेळा उद्घाटनही करण्यात आले. परंतु शिवसेनेला गोरगरीबांशी काही देणे घेणे नसून स्थायी समितीत 'भोजन' होत असल्याने ते गोरगरीबांची शिवथाळीच्या नावाखाली दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते व स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.
शिवथाळी पुन्हा सुरू करू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवथाळी योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना कॅन्टीन चालकाने बंद केली असल्यास, त्याची माहिती घेण्यात येईल. सबसिडीबाबत काही अडचणी असल्यास त्या त्वरित सोडवून शिवथाळी योजना त्वरित सुरू करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.