मुंबई - देशभरात आक्रमक वक्तृत्त्व शैलीसाठी ओळखले जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत आज मुलीच्या लग्नाच्या पाठवणीच्या वेळी भावुक होताना दिसले. सर्वसामान्य घरात ज्याप्रमाणे पाठवणीवेळी जसे वातावरण होते तसेच वातावरण यावेळी होते. मुलीच्या लग्नात राऊत यांनी नृत्यही केलं. यानंतर पाठवणीच्यावेळी मात्र बापाचे हृदय भरून आले. भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे राऊत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ( ( Sanjay Raut Emotional During Daughter Marriage )त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि त्यांनी स्वतःहून मुलगी पूर्वशी हिचा हात पकडून पाठवणी केली. ( Sanjay Raut Daughter Marriage )
अनेक मान्यवर उपस्थित -
राऊत यांची कन्या पूर्वशी हिची मल्हार नार्वेकर यांच्याशी आज लग्नगाठ बांधली गेली. काही दिवसापूर्वी यांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता. मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र आहेत. मुंबईतील रेनेसान्स या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेस नेते संजय निरुपम इतर राजकीय नेते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.
लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यानंतर वर्षा राऊतांनी पतीसह नृत्य केले. यानिमित्ताने पुन्हा एकदा संजय राऊत आणि पवार कुटुंबातील स्नेहसंबंध समोर आले आहेत. हा व्हिडिओदेखील मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. यावर काहीनी टीका तर काहींनी या व्हिडिओची प्रशंसा देखील केली होती.
कोण आहेत मल्हार नार्वेकर?
संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा समारंभ काही दिवसापूर्वीच झाला. राऊत यांचा जावई मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव आहेत. राऊत यांच्याप्रमाणे राजेश नार्वेकर देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.