मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे चांगली संसाधने आहेत. आपल्याकडे लस देखील आहे. 11 एप्रिलला ज्योतीबा फुले यांची जयंती आहे तर, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. मात्र, राज्यात लसच उपलब्ध नाही तर, जनतेने आणि आम्ही हा कार्यक्रम कसा राबवायचा? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
रूग्णसंख्या जास्त असल्याने लसीची गरज जास्त -
राज्यातील लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी वाद का घातला जात आहे? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे. लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी राजकारण न करता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे संजय राऊत म्हणाले.
सर्वांनी एकत्र येऊन काम करावे -
राज्यात कोरोनामुळे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाबात सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या बैठका घेत आहेत, त्याच प्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देखील बैठका घेत आहेत. असे असतानाही राज्य सरकार कमी पडत असेल तर विरोधी पक्षाने सुचना कराव्यात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे राऊत म्हणाले. कोरोनाने कोणालाही सोडलेले नाही. आमदार अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे सगळे राजकीय प्रश्न बाजूला सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; खासगी रूग्णालयात उपचार सुरू