मुंबई - पीक विमा कंपन्यांवर ना जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण, ना कृषीमंत्र्यांचे, यामुळे पीक विमा कंपन्यांचे सध्या चांगले दिवस आले आहेत. असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांना विमा कंपन्या तुटपुंजी रक्कम देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेला घराचा आहेर दिला.
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शिवसेनेची आणखी एक मदत मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी राज्यातील सर्व शिवसेना मंत्री, आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी पाटील बोलत होते.
पीक विमा कंपन्या जर दाद देत नसतील तर विमा कंपन्यांविरोधात कोर्टात दाद मागू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे सांगत गुरुवारपासून आम्ही शेतकऱ्यांचे फॉर्म भरू, मात्र शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर शेतकरी अंगावर येऊ नये एवढी काळजी घ्यावी, अशी विनंतीही पाटील यांनी केली.