मुंबई - राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. महाविकास आघाडीच सरकार 5 वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राऊत बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है...और आलबेल रहेगा असही संजय राऊत म्हणाले.
मोठया प्रमाणात कोकणी माणसं गणेशोत्सवासाठी गावी जाण्याकडे वाट बघत आहेत. त्यामुळे कोकणातील गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले. चर्चेचा मुख्य विषय कोरोनाच्या उपाययोजना हा होता. तसेच प्रत्येक विभागातील कोरोनाच्या परिस्थितिचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
या बैठकीत कोरोना हा प्रामुख्याने विषय होता. आम्ही आमची मत मांडली. तसेच मुख्यमंत्र्यांनी मी कुठे चुकत असेल तर सूचना करण्यास सुचवल्याचेही खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.