मुंबई: चलनी नोटांवरील फोटोंवरुन देशात राजकारण ढवळून निघाले आहे. (currency photo controversy). अनेकांकडून नोटांवर नव्या नावांचे पर्याय दिले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाने यावरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकारने नोटांवरील फोटोंपेक्षा घसरणाऱ्या रुपयाकडे लक्ष द्यावे, असा टोला शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी लगावला आहे.
काय म्हणाले परब? : नोटांवरून चालू असणाऱ्या राजकारणावर परब म्हणाले की, शिवसेनेने कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे. नोटांच्या राजकारणात शिवसेना कधीही जात नाही. परंतु प्रत्येकाला आपला नेता नोटांवर हवा असतो. मी शिवसैनिक आहे. मला वाटतं, माझा नेता दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा फोटो नोटांवर असायला हवा. पण माझ्या इच्छेला काही अर्थ नाही. संपूर्ण निर्णय सरकार घेत असतो. सरकार मात्र जाणूनबूजून हे वाद निर्माण करत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर टीका करताना, देशाचे मुल्यमापन रुपयांवर अवलंबून असते. त्यामुळे रुपया घसरत नाही, देश घसरत आहे. सरकारने याची काळजी घ्यावी अशी मागणी परब यांनी यावेळी केली.
काय आहे वाद? : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो छापण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यावर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तर नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जात आहेत, असा काँग्रेसचा आरोप आहे.
बच्चू कडूंच्या स्वाभिमानाची लढाई: माजी राज्यमंत्री बच्चू कडूंवर (bacchu kadu) भाजप आमदार रवी राणांकडून 50 खोके घेतल्याचा उघडपणे आरोप करण्यात येतो आहे. आरोप सिध्द करण्यासाठी कडूंनी येत्या 1 तारखेपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. याबाबत, परब यांनी छेडण्यात आले असता, बच्चू कडू यांनी ही लढाई जोरात लढावी. त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मात्र, पैशांबाबत केलेल्या विधानाबाबत स्पष्टता बोलून दाखवलेली नाही. त्यांनी समोर स्पष्ट करावे. तसेच हे प्रकरण न्यायालयात गेल्यास साक्ष तापसली जाईल, त्यामुळे सगळे समोर येईल, असे परब यांनी सांगत बच्चू कडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच दुश्मन का दुश्मन, दोस्त होता है, असा हिंदी सिनेमाचा डायलॉग त्यांनी शेवटी मारला.