मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) दिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येते काहीजण आंदोलन करत होते. त्यामध्ये अनेकांनी अनेक फलके घेऊन सहभाग नोंदविला. त्यातील एका मुलीच्या हातात फ्री कश्मीर, असे लिहिलेला फलक होता. यावरून विरोधी पक्षाने हा देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?, असे म्हणत सरकारला प्रश्न विचारला होता. पण, मेहक या मुलीने तिची भूमिका स्पष्ट केल्यावर विरोधी पक्ष तोंडावर आपटले आहेत. त्यामुळे आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते, असा टोला सामनातून लगावला आहे.
फडणवीस विरोधीपक्ष नेते झाल्यापासून विरोधी पक्ष दिशाहीन झाला आहे
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे. याचे दुःख होत आहे. विरोधी पक्षाचे इतके अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती. पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत. तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून टीका झाली.
... तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत
मेहक प्रभू नावाच्या मराठी मुलीने त्या पोस्टरबाबत तिची भूमिका मांडली. ती म्हणाली, माझ्या दृष्टीने 'फ्री कश्मीर' म्हणजे देशातून फुटून निघणे असा होत नाही. तर आज काश्मीरच्या नागरिकांवर जी बंधने लादली आहेत, त्यांना देशापासून तोडले आहे. इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा अशापासून सुरक्षेच्या जोरजबरदस्तीने वंचित ठेवले आहे. या सगळ्य़ा बेडय़ांतून तेथील जनतेस मुक्ती मिळावी, म्हणजे 'फ्री कश्मीर' आहे. पण, काश्मिरी जनतेची वेदना एका मुंबईकर मराठी मुलीने मूकपणे मांडली. यावर विरोधी पक्ष म्हणतो हा देशद्रोहच आहे. विरोधी पक्षाच्या बेजबाबदारपणाचे यापेक्षा घाणेरडे उदाहरण दुसरे नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भक्तगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
विधानसभेचे तिकीट नाकारले म्हणून त्यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केला काय?
विजय वडेट्टीवार खातेवाटपावरून नाराज असल्याची बातमी येताच माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले, वडेट्टीवारांनी काँग्रेस सोडावी व भाजपत यावे. यावर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले म्हणून त्यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केला काय?, असा सवाल सामनातून व्यक्त करण्यात आला आहे.
विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज
फ्री काश्मीर पोस्टरवरून विरोधी पक्षनेते देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?, असे प्रश्न विचारत आरोप करत आहेत. यावरून ठाकरे सरकार पडणार नाही. उलट तीन पक्ष अधिक घट्ट होतील, असे म्हणत विरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्य या विषयावर विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.