मुंबई : महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकात दोन-तीन दिवसात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानाचे दिवस जवळ येताच प्रचाराची चक्रे जोरात फिरू लागली आहेत. त्यात निवडणुकांचा प्रचार म्हटले तर भाजपासाठी ते एखाद्या इव्हेंटसारखेचं असते. पण कर्नाटकात सांगता येणारी कोणतीच कामे झाली नसल्याने निवडणूक प्रचारात भाजपाला त्यावर मत मागता येईना झाले आहे. आता निवडणुका जिंकायच्या कशा यासाठी पंतप्रधान मोदीसह स्टार प्रचारकांनी थेट देवांना कामाला लावले आहे. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
बजरंगबलीला आणलं प्रचारात : कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचे शेवटच्या दिवसात प्रत्येक पक्षांनी प्रचाराची चक्रे जोरात फिरवण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील विधानसभा आपल्याकडे राहावी यासाठी केंद्रातील भाजपाने सर्व कॅबिनेट मंत्र्यांना प्रचारासाठी उतरवले आहे. प्रचारात विकास कामाचे मुद्दे नसल्यामुळे भाजपाने नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही धर्माचा मुद्दा उपस्थित केला आहे. दिल्लीतील बाटला चकमकीचा मुद्दा नव्याने उपस्थित करत पंतप्रधान मोदींनी ही निवडणूक आपल्या मैदानावर आणून मैदान मारण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा फायदा काही झाला नाही, राज्यात विकासाची कामे किंवा कोणतीच अशी खास काम तेथील भाजपा सरकारने केले नाही. यामुळे प्रचारात त्याचे भांडवल करता येत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कर्नाटक राज्य वाचवणं मोठं संकट बनले आहे. हेच संकट दूर करण्याासाठी पंतप्रधान मोदींनी देवांना कामाला लावले आहे. यावेळी प्रभू राम यांना बाजूला सारत त्यांनी संकटमोचक बजरंगबली यांना प्रचारात आणले आहे. निवडणुकीसाठी देव, धर्म प्रचारात आणण्यावरुन शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रात पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.
हिशोब कोण देणार : एका राज्याची निवडणूक जिंकण्यासाठी देशाचा पंतप्रधान सर्व गोष्टी सोडून प्रचार करत फिरत आहे. त्यासाठी आपला सर्व लवाजमा घेऊन पंतप्रधान पक्षाच्या प्रचार मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान असल्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागते. सुरक्षेपासून ते प्रचार स्थळापर्यंत जाण्याचा मार्ग सर्वांवर नियंत्रण मिळवावे लागते. यात लागणारा पैसा हा कोट्यवधी रुपयात असतो. परंतु या खर्चाची बिले कोणी विचारत नाही. तर विरोधी पक्षांना मात्र काडी-काडीचा हिशोब द्यावा लागतो.
भाजपा म्हणेल ती पूर्व दिशा : भाजप प्रत्येक निवडणुकीचा प्रचार हा धर्माच्या नावावरुन करत असते. हिंदू-मुस्लिम करुन भाजप सत्तेचे फळ चाखत आहे. कर्नाटक निवडणुकीतही भाजपाने धर्माचे कार्ड वेळेवेळेवर वापरले आहे. मतदारांनी भाजपाला मतदान करावे म्हणून मोदींनी थेट संकटमोचक बजरंगबलीचे नाव घेण्यास सांगितले. बजरंगबलीचे नाव घ्या भाजपाचे बटन दाबा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावरुन संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांनी एकदा प्रचारात धर्माचा उल्लेख केला होता. धार्मिक प्रचार केला म्हणून सहा वर्षासाठी त्यांचा मतदान करण्याचा हक्क काढून घेण्यात आला होता. पण पंतप्रधान असो किंवा भाजपाचे स्टार प्रचार हे नेहमी देवांना आणि धर्माला प्रचारात आणत असतात, त्यावर काहीच कारवाई होत नाही. तर शासकीय कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रचारात लावल्याने इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. या शिक्षेत त्यांना त्यांची लोकसभेची निवड रद्द करावी लागली होती.
घटनात्मक संस्था मोदींच्या दावणीला: पंतप्रधान मोदी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला चालना देत असल्याची टीका देखील या मुखपत्रातून केली आहे. केंद्राच्या हातात घटनात्मक संस्था असल्याने विरोधी पक्षांना दाद मागण्यास जागा नाही. मुंबईसह १४ महानगरापालिकेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने रोखल्या आहेत. तर राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालासाठी तारखांवर तारखा येत आहेत. त्याच जागेवर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यासाठी न्यायालय थोडाही विलंब करत नाही. पण आदानी सारख्या लोकांची चौकशीचे आदेश देण्यास न्यायालय तयार नसल्याची टीका राऊत यांनी यात केली आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही देशातील राजकीयस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते 2024 मध्ये भाजपाचा पराभव होण्याची शक्यता आहे.