मुंबई- 'बंडखोरांनी माघारी घ्यावी अन्यथा त्यांची खैर नाही, युतीत बंडखोरांना कोणतेही स्थान राहणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेना भाजपच्या बंडखोरांना दिला होता. तरी त्याचा फारसा परिणाम बंडखोरांवर झाला नाही. मुंबईतही शिवसेना भाजपच्या उमेदवारांसमोर बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर आमची पक्षाविरोधात नाराजी नसून उमेदवारांविरोधात नाराजी असल्याचे म्हणणे बंडखोरांचे आहे.
हेही वाचा- वाहन उद्योगावर दसऱ्यातही मंदीची पडछाया; विक्रीत ५० टक्क्यांनी घसरण
'माझी बंडखोरी शिवसेना भाजप विरोधात नसून व्यक्तिशः आहे. वर्सोवा विधानसभेच्या युतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांनी गेल्या 5 वर्षात सुडाच राजकारण केलं आहे. आम्ही सर्व पक्षानी भारती लव्हेकर यांना उमेदवारी देऊ नका असे म्हटलं होते. तरी दोन्ही पक्षांनी आमचं न ऐकता त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळेच मला अपक्ष उभं राहावं' लागल्याची प्रतिक्रिया नगरसेविका व वर्सोवा विधानसभेच्या अपक्ष उमेदवार राजुल पटेल यांनी दिली. राजुल पटेल या शिवसंग्रामच्या नेत्या व आमदार भारती लव्हेकर यांच्या समोर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या रमेश लटके यांच्यासमोर भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
'मी बंडखोरी केली नाही. अंधेरीच्या जनतेने मला एबी फॉर्म दिला आहे. ही निवडणूक मुरजी पटेल लढवत नसून अंधेरीची जनता लढवत आहे. अंधेरीची जनता माझ्या पाठीशी आहे. हीच माझी पोचपावती आहे. माझा कोणावरही राग नाही,' असे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नगरसेवक व अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांनी सांगितले.