मुंबई - वाढती महागाई, पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी सायकल रॅली काढत आंदोलने केली. भांडुपमध्ये देखील शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्त्वाखाली सायकल रॅली काढून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ युवासेना भांडुप तर्फे सायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी सहभागी होत महागाई विरोधात, 'पेट्रोल गेले शंभरी पार, होष में आवो मोदी सरकार', 'हेच का ते अच्छे दिन', 'मोदी सरकार हाय हाय' या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा - समीर वानखेडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली; नवाब मलिकांचा पुनरुच्चार
शिवसैनिकांनी भांडुपच्या लाला शेठ कंपाउंड ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंत सायकल रॅली काढली. भविष्यात पेट्रोल-डिझेलचे दर असेच वाढत राहिले तर गाड्या सोडून फक्त सायकलच चालवाव्या लागतील. त्यासाठी सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून लवकरात लवकर पेट्रोल डिझेल गॅसचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणावेत, हा इशारा देण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले आहे.
गेल्या सात वर्षांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्याबरोबर घरगुती गॅस दरही वाढलेले आहे. पेट्रोल आणि डिझेल बाकी देशांमध्ये कमी आहेत फक्त आपल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दर वाढलेले आहेत. हे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार काही करताना दिसत नाही आहे. घरगुती गॅसचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे दर कमी झाले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, असे आमदार रमेश कोरगावकर यांनी उपस्थित केला.