मुंबई - प्रचार साहित्यात पक्षाचे चिन्ह न लावल्याने शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला प्रचारात मदत न करण्याची भूमिका शिवसंग्रामने घेतली आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात कोणत्याही कार्यक्रमात शिवसेनेच्यावतीने आम्हाला बोलावण्यात येत नाही. तसेच प्रचाराच्या कोणत्याही साहित्यात आमच्या नावाचा उल्लेख केला जात नाही. यावरून शिवसेनेला आमच्या सहकार्याची गरज नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत शिवसंग्रामचे कार्यकर्ते तटस्थ राहतील. तसेच जोपर्यंत आम्हाला मानसन्मान देत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतल्याचे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी मस्के यांनी सांगितले.