मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था दिवस-रात्र प्रयत्न करत आहे. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांचे हाल होत आहेत. या संकटकाळात आपलाही हातभार लागावा या हेतूने शिवडी स्थानकातील स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचे वाटप करत आहेत.
सिन्हा यांनी आत्तापर्यंत स्वखर्चाने 10 हजार पेक्षा जास्त नागरिकांना सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हज चे वाटप केले आहे. रेल्वे स्थानकावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि पोलिसांचीही ते विशेष काळजी घेतात. कोरोनापासून संरक्षण करणारे मास्क आणि सॅनिटायझर विकत घेण्याइतके पैसेही अनेक नागरिकांकडे नाहीत. अशासाठी एन. के. सिन्हा हे दूत ठरले आहेत. ते आपल्या वाहनाने शिवडी ते सीएसटी या भागात फिरतात. या भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसह स्वयंसेवक आणि पोलिसांना ते या वस्तू देतात. या वस्तूंचा वापर करुन नागरिक कोरोनाला लांब ठेवू शकतात.
एन. के. सिन्हा हे वेळोवेळी आपल्या कामाने चर्चेत असतात. स्थानकातील सफाई, सुशोभीकरणाबद्दल त्यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. एक उत्तम स्टेशन मास्तर म्हणून त्यांची मुंबईत ओळख आहे. कोरोनाच्या संकटात ते या अशा प्रकारची मदत करून पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.
या कोरोना संकटात गरजूंना विविध माध्यमातून मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आत्तापर्यंत दहा हजार लोकांना या वस्तूंचे वाटप त्यांच्या भागात जाऊन केले आहे. काही वेळा जेवण ही वाटले आहे. परंतु एकटा हे सर्व करत असल्यामुळे काही भागात फिजिकल डिस्टन्स राहत नाही. त्यामुळे जेवण वाटणे बंद केले. सध्या जेवणापेक्षा कोरोनापासून बचाव करणाऱ्या वस्तू महत्त्वाच्या आहेत. यामुळे त्या वाटण्याचे जास्तीतजास्त प्रयत्न करत आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.