मुंबई - शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज शिवजयंती असतानाही सुशोभीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे मनसेने निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख म्हणून काम न करता, मुख्यमंत्री म्हणून काम करावे, असा टोला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
शिवसेना नेहमी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करते. मात्र, यंदा शिवसेना सत्तेत असल्याने पक्षप्रमुख असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करतील, हे यापूर्वीच शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले होते. तर शासकीय शिवजयंती असूनही शिवाजी पार्कमधील अश्वारूढ पुतळ्याची सजावट व सुशोभीकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.
हेही वाचा - ओएलएक्सवर जाहिरात देऊन लूट करणारे दोघे जेरबंद
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख म्हणून काम न करता मुख्यमंत्री म्हणून काम करावे. शिवाजी पार्कचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' करावे, अशी मागणी शिवप्रेमींची आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याचे 'शिवतीर्थ' असे नामकरण केले होते. त्याबाबत मुख्यमंत्री यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे किल्लेदार म्हणाले.
तर शिवाजी पार्क वरील शिवाजी महाराजांचा पुतळा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. हा पुतळा पालिकेकडे वर्ग करता येईल का ते पाहू. स्थानिक वॉर्डकडे हे वर्ग झाले तरी चांगली निगा राखता येईल. आता त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा - 'झाडा'झडती..! वनमंत्र्यांनी दिले मुनगंटीवारांच्या चौकशीचे आदेश