मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली होती. यात 23 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 'शिव संपर्क अभियान' राबवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला.
हेही वाचा - नायर रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; कारण अस्पष्ट
बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. तर, येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यावर देखील लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश या बैठकीतून देण्यात आले. बैठकीत संघटना वाढवण्यासंदर्भातही चर्चा झाली.
बैठकीला वनमंत्री संजय राठोड गैरहजर
बैठकीला पदाधिकाऱ्यांसह इतर काही मंत्री देखील उपस्थित राहणार होते. यामध्ये सध्या चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, राठोड या बैठकीला उपस्थित नव्हते. राठोड नेमके कुठे आहेत, गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा फोनही नॉटरिचेबल आहे. त्यामुळे, राज्याचे वनमंत्री नेमके आहेत कुठे, असा प्रश्न केला असता आमदार दिलीप लांडे यांनी, ही बैठक केवळ पदाधिकाऱ्यांसाठी बोलवण्यात आली असून कोणत्याही मंत्र्यांना इथे आमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - टूलकिट प्रकरण : निकिता जेकबने उच्च न्यायालयात केला 'हा' दावा; शंतनूचाही औरंगाबाद खंडपीठात अर्ज