मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष पूर्व तयारीला लागले आहेत. देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीत संघर्ष पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण केली आहे. शिवसेना (शिंदे गटातील) काही खासदार आगामी लोकसभा निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
जनतेचा कल भाजपाकडं : देशातील तीन राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभेत भाजपानं विजय मिळवलाय. तर, फक्त तेलंगणात काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात यश आलं आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं असून तीन राज्यांमध्ये कमळ फुललं आहे. या राज्यांतील निवडणुका लक्षात घेता शिंदे गटाच्या खासदारांनी धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्यास अधिक फायदा होईल, अशा चर्चा सुरू आहेत.
जितेंद्र आव्हाड : शिंदे गटाला किती जागा मिळतील याची खात्री नाहीये. शिवसेना (शिंदे गटाला) निवडून यायचं असेल, तर कमळाशिवाय पर्याय नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र अव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे गटातील काही खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं जितेंद्र अव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शिंदे गटच नाही, तर अजित पवार गटाच्याही आमदार, खासदारांना भाजपाच्या तिकिटावर लढावं लागेल, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
चर्चेत तथ्य नाही - संतोष बांगर : याबाबत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या चर्चेत तथ्य नसून आम्ही शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्हावरच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे.
भाजपा प्रादेशिक पक्ष संपवतोय : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी देशात सूडाचं राजकारण आणण्याचं काम केलं. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिलेली आश्वासनं बाजूला ठेवून विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्षांना कसं संपवायचं याबाबत जाहीर वक्तव्य केलंय. 2024 पर्यंत कोणताही प्रादेशिक पक्ष राहणार नसल्याचं नड्डा म्हणाले होते. त्यामुळं काही पक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -