मुंबई - मुंबई महानगरपालिकेत गेले २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात शिवसेनेचा भाजपा हा मित्र पक्ष होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच मुंबई महापालिकेत भाजपाने विरोधाची भूमिका घेतली. यामुळे पालिकेत शिवसेनेला राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने खुले मतदान करत, तर काँग्रेसने तटस्थ राहून आघाडीचा धर्म पाळला आहे.
२०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येताच २०१७ ची निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली. निवडणूक वेगवेगळी लढवली तरी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. हा पाठिंबा देताना भाजपाने आपण पालिकेतील कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नाही, कोणत्याही पदावर दावा करणार नाही, असे जाहीर केले. यामुळे विरोधी पक्ष नेते पद नियमानुसार काँग्रेसला मिळाले.
२०१९ मध्ये राज्यातील समीकरणे बदलली. भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने सरकार स्थापन केले. भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. यामुळे भाजपाने मुंबई महापालिकेतही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान पालिकेच्या वैधानिक, विशेष आणि प्रभाग समितीच्या निवडणुका भाजपाने लढवण्याची घोषणा केली. भाजपा निवडणूक लढवताना काही दगा फटका करेल, म्हणून पालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने खुलेआम सत्ताधारी शिवसेनेला मतदान केले. तर, काँग्रेसने तटस्थ राहून शिवसेनेला मदत केली. याबाबत भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्ष काँग्रेसने निवडणुकीपूर्वी नांगी टाकल्याची टीका भाजपाने केली आहे. यामुळे पालिकेत खरा विरोधी पक्ष कोण? हे मुंबईकरांना कळले असल्याचे भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचे म्हणणे आहे.
तर, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेला मतदान केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव व समाजवादी पक्षाचे गटनेते आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते, म्हणून आम्ही त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मुंबईकरांच्या प्रश्नावर सत्ताधारी शिवसेनेला आम्ही जाब विचारत राहू. येत्या काही वर्षात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने सत्ताधारी शिवसेना किंवा भाजपाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सध्या सत्ताधारी शिवसेनेला राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने मदत केली आहे. यामुळे पालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष अशी युती पाहायला मिळू शकते. सध्या काँग्रेस विरोधी पक्षात असली तरी भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसही शिवसेनेसह आघाडी करू शकते.
हेही वाचा- ग्रंथालयांची कवाडे उघडा; राज ठाकरेंचा मंत्री उदय सामंतांना फोन