मुंबई : Shraddha Walkar murder case : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. Sanjay Raut On Shraddha Walkar Murder राऊत म्हणाले की, दिल्लीमध्ये अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना घडली. प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. सहा महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर, पोलिसांनी या विकृत प्रियकराला बेड्या ठोकल्या. या प्रकरणांतील आरोपींवर खटले चालवू नयेत, यांच्यावर जर राजकारण कोणी करत असतील तर, ते थांबवले पाहिजे. अशा हत्याऱ्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे.
हत्याकांडाचे मुंबई कनेक्शन: श्रद्धा विलास वालकर ही तरुणी वसई येथील संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहत होती. मात्र, घरच्यांनी आफताफसोबत लग्नास विरोध केल्याने ती वाळी व नंतर वसई येथे आफताबसोबत राहू लागली. जानेवारी 2020 मध्ये श्रद्धाच्या आईचे निधन झाले. त्यावेळी निधनानंतरच्या श्राद्धविधीसाठी पंधरा दिवसांनी श्रद्धा आपल्या घरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतर ती पुन्हा आफताफसोबत राहू लागली. दरम्यान, या दोघांमध्ये खटके उडत असत मार्च 2022 मध्ये आफताफ आणि श्रद्धा हे दोघेही दिल्ली येथे गेले. त्यानंतर श्रद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या मुंबईतील वसईतील मित्र- मैत्रिणींच्या संपर्कात होती.
मेसेजला रिप्लाय नाही: श्रद्धाच्या एका मित्राने तिला ऑगस्ट महिन्यात मेसेज केल्यानंतर काहीच रिप्लाय न आल्याने त्याने याबाबत श्रद्धाचा भाऊ श्रेयसला कळवले. त्यानंतर श्रेयस आणि श्रद्धाच्या वडिलांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाचाच एक भाग म्हणून माणिकपूर पोलिसांनी आफताबसह त्याच्या आई-वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबरला देखील आफताफला दिल्लीहून मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
आफताबही पोलीस ठाण्यात : आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करुन रोज एक- एक अवयव जंगलात फेकले. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दरम्यान तो माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन वेळा येऊन गेला होता अशी माहितीही पोलिस सूत्रांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.
ओळख ते हत्याकांड: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांची मुंबईत नोकरीदरम्यान डेटिंग अॅपद्वारे मे २०१७मध्ये भेट झाली. 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले.
एक फूट लांब सुरीचा वापर : 18 मेला आफताफने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे इंटरनेटवर रात्रभर सर्च केले आणि त्यानंतर मृतदेहाला कसे चिरतात हे त्याने इंटरनेटवर पाहिले आणि त्याप्रमाणे शरीराचे तुकडे तुकडे केले. मृतदेहाचा वास येईल म्हणून त्याने प्रथम आतड्यांची विल्हेवाट लावली आणि मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. हत्या करण्यासाठी आफताफने एक फूट लांब सुरीचा वापर केला होता.
आफताबचे वडील मुंबईत शिफ्ट : दरम्यान आरोपी आफताफचे वडील अमीन पुनावाला हे पत्नीसह वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. या सोसायटीचे अध्यक्ष आदिल खान यांनी माहिती दिली की, पंधरा दिवसांपूर्वीच आफताफचे वडील आणि आई यांनी येथील घर रिकामे करून मुंबईत शिफ्ट होतो असे सांगून निघून गेले. त्यामुळे आपल्या मुलाने मोठा गुन्हा केल्याचे कळाल्यानंतर आपले राहण्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय आफताबच्या पालकांनी घेतला तर नाही ना? अशीही चर्चा आहे.