मुंबई Shiv Sena MLA Disqualification Result : आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर लगेच दिली होती. त्याप्रमाणं ठाकरे गटाकडून सोमवारी (15 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादा सोडल्या, अशा शब्दांत आमदार अपात्र निकाल प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती.
उद्धव ठाकरेंची मंगळवारी महा पत्रकार परिषद : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार (16 जानेवारी) 'महा पत्रकार परिषदे'चं आयोजन करण्यात आलंय. पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे 'जनता न्यायालय' असेल. 'सत्य ऐकून विचार करा!' असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय. त्यामुळं या पत्रकार परिषदेकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
काय दिला होता निकाल : सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला लागलाय. या प्रकरणात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं सुमारे वर्षभर सुनावणीवर सुनावण्या होत निकालाचा चेंडू अखेर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून, 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल दिलाय. तसंच ठाकरे गटाच्याही कोणत्याच आमदाराला अपात्र ठरवण्यात आलेलं नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान : जर न्यायाधीश आरोपीची भेट घेत असतील तर यांच्याकडून कशी अपेक्षा करणार? असं म्हणत, हा निर्णय म्हणजे मॅच फिक्सींग होती, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर केला होता. जर घटना ग्राह्य धरत नाहीत तर आम्हाला अपात्र का केलं नाही? असा उलट प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केलाय. या निर्णयानं नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलाय असं म्हणत, यांनी स्वत:च्या अंगावर संकट ओढावून घेतलंय. तसंच, लोकही मोठ्या प्रमाणात संतापले असून, ही लढाई आता लोकांमध्ये होईल. लोकच यांना धडा शिकवतील, असंही ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा -