मुंबई - वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर अनेकांना चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याचं म्हटलं. यावर आज 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक' सदरातून 'गोस्वामी झिंदाबाद'चे नारे देणाऱ्यांची 'पाठशाळा घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले आहे. पंतप्रधान मोदी वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अर्णब गोस्वामींच्या बाजूने उभे राहिले व मृत अन्वय नाईक, त्यांची पत्नी, मुलगी यांचा आवाज दडपण्यात आला. हे प्रकरण निर्भयापेक्षा, हाथरसकांडापेक्षा भयंकर आहे, असेही त्यांनी लेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे लेखात...
भारतीय घटनेचे 19 वे कलम प्रत्येक हिंदुस्थानीयास मताचा व मतप्रसाराचा अधिकार देते. आता बरेचसे पत्रकार, संपादक व वृत्तवाहिन्या या सरकारच्या शागीर्द झाल्या आहेत. ज्यांनी ही शागिर्दी पत्करण्यास नकार दिला त्या सर्व वरिष्ठ पत्रकारांना नोकऱया गमवाव्या लागल्या व 'एनडीटीव्ही'सारख्या वृत्तवाहिन्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळण्यात आल्या. सरकारच्या विरोधकांवर जे उकिरडय़ावरील कुत्र्यांसारखे भुंकत राहिले त्यांचे सर्व गुन्हे माफ झाले. त्यांची आर्थिक ताकद जणू गंगेतून शुद्ध होऊनच आली व इतरांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला. हासुद्धा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्लाच आहे. हाथरस बलात्कार कांडात उत्तर प्रदेशात प्रशासनाने जे 'कर्म' केले ते रोखण्यासाठी चार दिवस हाथरसच्या सीमेवर पत्रकारांना रोखले. हे चित्र आणीबाणीचे, वृत्तपत्र स्वातंत्र्य चिरडण्याचेच होते, असेही त्यांनी म्हटलं.
आणीबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला
आणीबाणीत वृत्तपत्र स्वातंत्र्याचे हवन झाले हे सत्य व त्याचा फटका बाळासाहेब ठाकरे यांना बसला. महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य होते व त्यांनी बाळासाहेब ठाकरे संपादक असलेल्या 'मार्मिक' प्रेसलाच टाळे ठोकले. ही दडपशाहीच होती. त्या दडपशाहीला झुगारून आणीबाणीत 'मार्मिक' प्रसिद्ध होत होता. वर्ध्याच्या पवनार आश्रमात विनोबांच्या छापखान्यावर तेव्हा धाडी पडल्या. इंदिरा गांधींना आव्हान देणाऱया रामनाथ गोयंकांच्या 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्र समूहांवर धाडी पडल्या. संपादकांवर दबाव आले. दोनशेपेक्षा जास्त खटले रामनाथ गोयंकांवर दाखल केले. हा माझ्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होता, असे त्यांनी लेखात म्हटलं आहे.
'महानगर'चे तत्कालीन संपादक हे शिवसेना व शिवसेनाप्रमुखांवर खालच्या पातळीवर टीका करीत तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर दोन वेळा हल्ला केला व वागळे यांच्या समर्थनार्थ देशभरातील पत्रकार शिवसेना भवनासमोर एकवटले होते. 'लोकसत्ता'चे माजी संपादक असताना कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला झाला. हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचाच हल्ला होता. अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भाजप उतरला, पण पत्रकार लांब आहेत. कारण गोस्वामी यांच्या पत्रकारितेने संपूर्ण क्षेत्रालाच बदनाम आणि कलंकित केल्याची भावना आहे, असेही ते म्हणाले.
चारित्र्यहनन, चिखलफेक, अफवांचा प्रसार करणे हा वृत्तपत्रांचा, मीडियाचा धंदा बनला असेल तर त्यास सरकारसह सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. लाचार पत्रकारांचे टोळके भोवती गोळा केल्याने नेते मोठे होत नाहीत. आज तेच चालले आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झालेल्या पत्रकाराच्या समर्थनासाठी केंद्रीय मंत्री उभे राहतात. राजकीय पक्षाचे लोक रस्त्यावर आडवे पडतात. अक्षता नाईक व आज्ञा नाईक यांनी न्यायासाठी घातलेली साद त्यांच्या कानावर प्रहार करीत नाही, हे अमानुष आहे. निर्भया मेल्यावर तांडव करणारे लोक अन्वय नाईक यांच्या वाऱयालाही उभे राहायला तयार नाहीत. त्यांना चिंता आहे ती स्वातंत्र्यच धोक्यात आल्याची. स्वातंत्र्य कसलं तर चिखलफेक करण्याचं, बदनामी करण्याचं! राजकारणाचे व वृत्तपत्र स्वातंत्र्याचे हे असे गटार झाले आहे, असेही त्यांनी लेखात म्हटलं.