मुंबई Shiv Sena Leader On Aditya Thackeray : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या स्ट्रीट फर्निचर बाबतीत झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सहआयुक्त अजित कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती एक महिन्याच्या आत अहवाल देईल. तोपर्यंत सदर काम स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र "आदित्य ठाकरे यांनी मागील 20-25 वर्ष पालिकेच्या अनेक कामांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत जनतेला सांगावं. तेव्हा मात्र ते मूग गिळून गप्प बसतात. तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे सांगावं," अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी केलीय.
कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही : पुढं बोलताना सावंत म्हणाले की, "आदित्य आपण वयानं फार लहान आहात. आपणास एक सल्ला देतो, ज्याप्रमाणं कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. तसंच तुम्ही कितीही बोंबलून या मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य म्हटलं तरीसुद्धा ते मुख्यमंत्री घटनाबाह्य ठरु शकत नाहीत. कारण या देशाच्या घटनेला धरुनच ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. तुमच्याकडं काही अजेंडा उरला नाही, म्हणून तुम्ही सतत मुख्यमंत्र्यांवर टीका करत असता," असा हल्लाबोल अरुण सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर केलाय.
तुम्ही फक्त मुंबईला लुटलं : "मागील 20-25 वर्षे मुंबई पालिकेत तुमची सत्ता आहे. मुंबईसाठी काहीतरी चांगलं करण्याची तुमच्याकडं संधी होती. मात्र तुम्ही फक्त 20-25 वर्ष मुंबईला लुटलंय. बाकी काहीही केलं नाही. केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करायची म्हणजे आपण चर्चेत राहतो किंवा आपणाला प्रसिद्धी मिळते. इतकंच आदित्य ठाकरेंना माहित आहे," अशी बोचरी टीका शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी आदित्य ठाकरे आणि उबाठा गटावर केलीय.
हेही वाचा :
- Aditya Thackeray On CM : 'आम्ही सत्तेवर आल्यावर मुंबई लुटणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नोटीस जारी; वाचा काय आहे प्रकरण?
- आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, लूकआऊट नोटीस जारी करावी-नितेश राणे यांची मागणी