मुंबई - सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. यावर ५ जानेवारीला शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा चर्चा होत असतानाच संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले असून ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे.
'या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो,' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशा प्रकारचा सामना काही दिवसांपासून रंगला आहे. केंद्र सरकार 'ईडी'चा वापर शिवसेनेशी सूडबुद्धीने वागत आहे, अशी भावना शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. यामुळे राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर शिवसेनेने ईडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून येत होते. येत्या ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे बोलले जात असतानाच संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी (दि. 27 डिसें) नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी (29 डिसें.) त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
हेही वाचा - ईडीच्या नोटिसीसाठी माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय -संजय राऊत
हेही वाचा - 'ईडी नोटीस'प्रकरणी राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट