मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने 'मिशन मुंबई'ची घोषणा करत 2022 साठी कंबर कसली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपावर भाजपाचा शुद्ध भगवा फडकेल, असा दावा केला आहे. त्यावर शुद्ध भगवा फडकवायचा म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित करत वेळ आणि काळच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे, असे प्रत्त्युत्तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला दिले आहे.
भाजपाचा शब्दांचा खेळ -
भाजपाच्या कार्यकारणीची बैठक काल मुंबईत संपन्न झाली. या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबईची घोषणा करताना भाजपाचा शुद्ध भगवा फडकेल, असा दावा केला आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना भाजपाच्या झेंड्यात हिरवा, भगवा रंग आणि कमळही आहे. मग शुद्ध भगवा कसा फडकेल असा सवाल महापौरांनी उपस्थित केला. कधी पहारेकरी, कधी पारदर्शक तर कधी आम्ही निर्मळ काम करत आहोत, असे सांगत भाजपा शब्दांचा खेळ करत असल्याची टीका महापौरांनी केली आहे. मुंबईत जो शिवसेनेचा भगवा आहे तो भक्कम आहे. शिवसेना हा पक्ष वेळ काळ न बघता लोकांना मदत करणारा पक्ष आहे. यामुळे वेळ आणि काळ ठरवेल कोणाला निवडून द्यायचे, असे महापौरांनी म्हटले आहे.
सत्तेची फळे खाण्याची सवय -
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचार, ढोंगी हिंदुत्व, विकास प्रकल्पांना तोडपाण्यासाठी खोडा घालणारा पक्ष असा चेहरा लोकांच्या समोर आणू असे म्हटले आहे. यावर बोलताना कोण काय बोलते याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. जरी ते बोलत असले तरी अनेक ठिकाणी त्याच्या पक्षाचे प्रभाग समिती अध्यक्ष आहेत. त्यामुळे सत्तेची फळे तेही चाखत आहेत. त्यांना नेहमीच दिशाभूल करण्याची सवय झाली आहे, असे महापौरांनी म्हटले आहे.
हेही वाचा - वीज बिल प्रकरण : लाथो के भूत बातों से नही मानते…; मनसे नेत्याचा सरकारला इशारा
हेही वाचा - मनसे, शिवसेनेच्या दणक्यानंतर 'कराची' स्वीट्चे नाव झाकले