मुंबई - पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका करण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या या संभाषणात राम कदम आरोपींची सुटका करण्यास सांगत आहेत. त्यामुळे राम कदम हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आज शिवसेनेच्या माध्यमातून दादर येथील शिवसेना भवन येथे राम कदम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच कदम यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.
त्या क्लिपनंतर राम कदम अडचणीत -
सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी या आरोपींची नावे आहेत. ते दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होते. याशिवाय त्यांनी एका वाहनालाही धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, यानंतरही आरोपींकडून कायद्याचे उल्लंघन केले जात होते. पोलीस रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसेच मारहाण केली. या आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. त्यांचे संभाषण सद्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे. या क्लिपनंतर राम कदम अडचणीत आले असून विरोधक या क्लिपचा फायदा घेत भाजपवर टीका करत आहेत.
तर शिवसेना हे सहन करणार नाही -
याविरोधात आज शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या कृत्याने भाजपाचे गुंड तसेच त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार राम कदम यांनी आपली संस्कृती दाखवून दिली आहे. आम्ही कदम यांचा धिक्कार करतो. तसेच काही दिवसांपासून भाजप पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या अस्मितेला जर भाजप सारखा गुंड प्रवृत्तीचा पक्ष खतपाणी घालत असेल, तर शिवसेना हे सहन करणार नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो, असे शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी सांगितले.
हेही वाचा - भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त