मुंबई - देश कोरोना संकटात आणि आर्थिक मंदीत आहे. अशाही काळात पंतप्रधान बंगाल जिंकणार अशी घोषणा करत आहेत, तर गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल असे म्हणत आहेत. अमेरिकेत भयानक आर्थिक मंदी आली होती तेव्हा, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हुवर हे देशात सर्वकाही आबादीआबाद असल्याचे सांगत होते. तीच परिस्थिती सध्या भारतात असल्याचे सांगत शिवसेनेने म्हटले आहे, की देशात फक्त रुग्णालय आणि राजकारण तेवढे चालू आहे. स्मशाने, कब्रस्थानदेखील चोवीस तास चालू आहेत. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही. देशाला एका मनमोहन सिंगांची आणि रुझवेल्टची गरज असल्याचे सांगून मोदींनी आता टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे अशी 'रोखठोक' भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता रविंद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रेसिडेंट रुझवेल्टच्या भूमिकेत येऊन देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. देश संकटात असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण या कुठेही दिसत नसल्याची टीका करत, अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करुन त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट
देशाची आर्थिक स्थिती खालावत असताना राज्यकर्ते उदासीन आणि आत्मसंतुष्ट असल्याचे खरमरीत टीका खासदार राऊतांनी 'रोखठोक'मधून केली आहे. ते म्हणाले, 'आज देशात ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक चांगले अर्थतज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱ्यांचा प्रदेश आहे. 'हम बनिया लोग है' असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही 'आपण व्यापारी आहोत' असे वारंवार सांगितले, पण व्यापारीच दुकान थंडा करुन बसले आहेत.'
देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अमेरिकेच्या आर्थिक मंदीची आठवण खासदार राऊत यांनी या लेखात करुन दिली आहे. लेखात म्हटले आहे, 'तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हुवर यांनी अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात मात्र देशात आबादीआबाद असल्याचे म्हटले होते. तेच राजकीय वातावरण आज आपल्या देशातही आहे. इस्पितळे व राजकारण सोडले तर आपल्या देशात काहीच सुरु नाही. स्मशाने, कब्रस्तानेदेखील चोवीस तास सुरु आहेत. स्मशानांत लाकडांची टंचाई आहे व कब्रस्ताात जमीन कमी पडत आहे. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही.'
एक मनमोहन सिंग - एक रुझवेल्ट हवा
हुवरच्या कार्यकाळात गर्तेत गेलेल्या अमेरिकेला रुझवेल्ट यांच्या सरकारने बाहेर काढले असल्याचे खासदार राऊत यांनी लेखात म्हटले आहे. 'प्रे. रुझवेल्ट यांचे सरकार हे केवळ गतिमान व पुरोगामीच नाही, तर आनंदी व आनंदवर्धक आहे. जगा आणि जगू द्या पद्धतीचे आहे. दुःख विसरून कामास लागा, आनंदाची नवी क्षितीजे शोधा असे सांगणारे आहे. लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रुपांतर अर्थव्यवस्था गतिमान होण्यात झाले. हे मी का सांगतोय? आपल्याला आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहनसिंग आणि एक रुझवेल्ट हवा आहे.'
(फोटो साभार - दैनिक सामना)
हेही वाचा - केंद्र सरकारने राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवला; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार