मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. मातोश्रीवर लोकसभा मतदारसंघाबाबत निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर टीम आणि शिवसेना पदाधिकारी यांची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत शिरूर, शिर्डी, मावळ आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
प्रचार रणनिती ठरवण्याबरोबरच प्रत्येक मतदार संघातील बलस्थाने आणि कमतरता यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रशांत किशोर यांच्या टीमने शिरूर, शिर्डी, मावळ आणि नाशिक या मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत फिरून सेनेबाबत सर्वेक्षण केले. कोणते बलस्थान आहे व कुठे कमतरता आहे याचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आज मांडण्यात आला.
बैठकीला राज्यमंत्री दादा भुसे, अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणेसह मतदारसंघातील सेनेचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.