मुंबई Manisha Kayande On Supriya Sule : नाशिक पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणात सलमान फाळके याला मुंब्रा येथून अटक केली आहे. यावरून शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधलाय. आज मुंबईत मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सलमान फाळकेवर आरोप केले आहेत. तसंच कायंदेंनी राजकीय नेत्यासोबतचे फोटोही पत्रकारांना दाखवले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही जोरदार टीका केलीय.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत सलमान फाळके याचा फोटो आहे. फोटोमध्ये जितेंद्र आव्हाड सोबत शानू पठाणही दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत सलमान फाळकेचे फोटो आहेत. हे फोटोच सर्व काही सांगतात. तुम्ही काचेच्या घरात राहत असला, तरी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करणं कितपत योग्य आहे? - मनीषा कायंदे, आमदार
नेत्यांशी आरोपींचा काय संबंध : मराठा आरक्षण, अमली पदार्थ या दोन मुद्द्यांमुळं सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अनेक राजकीय नेते ड्रग्जमध्ये गुंतले आहेत, असा आरोप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसंच, या प्रकरणात गुंतलेल्यांची नावं लवकरच बाहेर येतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. यावर आज शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीष कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाणा साधलाय. ललित पाटील याला नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याची अजून चौकशी सुरू आहे. आणखी नावे पुढे येत आहेत. ललित पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, या प्रकरणात शरद पवार गटातील काही नेत्यांसोबतच आरोपींचे फोटो बाहेर येत असून, या नेत्यांशी आरोपींचा काय संबंध? असा सवालही मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांनी उत्तर द्यावे : पुढे बोलताना मनिषा कांयदे म्हणाल्या की, ठाणे येथे देखील ड्रग्ज सापडलं आहे. आमच्यावर विरोधकांनी बेछूट आरोप केले. मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले. पण आता सलमान फाळके, शानु पठाण यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी आरोप आहेत. यांचा ड्रग्जशी संबंध असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ही सर्व कोणाची मंडळी आहेत, यांना कोणाचं पाठबळ आहे. सलमान फाळकेला सध्या अटक केली आहे. पण, शानू पठाण याचा फोटो माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आहे, तसंच खासदार सुप्रिया सुळेंबरोबर सुद्धा काही आरोपींचे फोटो आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. या नेत्यांचा या आरोपीसोबत काय संबंध आहे. याचं उत्तर जितेंद्र आव्हाड-सुप्रिया सुळे यांनी द्यावं, अशी आमची मागणी असल्याचं मनिषा कांयदे म्हणाल्या.
हेही वाचा -