मुंबई : माध्यमातील जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वगळल्याने भाजपमध्ये नाराजी असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. जाहिरातबाजीवरून राजकारण तापल्यानंतर मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. दिल्लीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये देशात मोदी राज्यात शिंदे, अशी जाहिरात शिंदे गटाच्या हितचिंतकाने प्रकाशित केली. शिंदे गट आणि भाजपला 43 टक्के लोकांची पसंती असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. तसेच लोकप्रियतेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे 3 टक्क्यांनी पुढे असल्याचे दाखवण्यात आले आहे. राज्यात या जाहिरातीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेत्यांकडून थेट शिंदे गटावर टीका करत जाहीर नाराजीही व्यक्त केली. शिंदे गटाकडून यानंतर जाहिराती बाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिल्लीत नेमके काय शिजतय: राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अचानक दिल्लीला गेल्याने दिल्लीत नेमके काय शिजतय, अशी चर्चा आता रंगली आहे.
शिंदे गटाच्या जाहिरातीने वादात पडली भर-शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटांमध्ये लोकसभा विधानसभेच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष सुरू आहे. अनेकदा कलह चव्हाट्यावर ही आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या जाहिरातीने त्यात मिठाचा खडा टाकल्याने वाद रंगला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा एकत्रित कोल्हापूर दौरा असताना कानदुखीचे कारण देत, अचानक रद्द केला. त्यामुळे उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. वाद उफाळून आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा-
- जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात, प्रश्नांच्या सरबत्तीने मंत्री शंभूराज देसाईंची भंबेरी
- Sanjay Raut News: बाळासाहेबांचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो टाकला, पण..संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Maharashtra Politics: शिंदे गट- भाजपमध्ये फिसकटले? श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा, जाणून घ्या काय आहे वाद