मुंबई : Shinde Group Dasara Melava २०२३ : शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे हे आपला पक्ष कधी काँग्रेसमध्ये विलीन करतील हे सांगता येत नाही. तसंच विलीन केलं तरी आश्चर्य वाटायला नको, असेही शिंदे म्हणाले.
मैदान नाही, विचार महत्वाचे : यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, हा 'आझाद शिवसेनेचा' मेळावा आझाद मैदानावर होतोय. मी देखील असाच बसून बाळासाहेबांचे विचार ऐकायचो. बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातूनच 'गर्व से कहो हिंदू'ची घोषणा दिली. तेव्हापासून संपूर्ण देशात हिंदूत्वाची लाट आली. मैदान नाही, विचार महत्वाचे. बाळासाहेबांचे विचार कधी सोडले नाही. जिथे बाळासाहेबांचे विचार, तेच आमचं शिवतीर्थ.
हमासलाही पाठिंबा देऊ शकतात : बाळासाहेबांनी म्हटलं होतं, माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल. आता यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तरी आश्चर्य वाटणार नाही. एमआयएमचा पाठिंबा घेतला तरी आश्चर्य वाटणार नाही. आता हे दहशतवादी संघटना हमासलाही पाठिंबा देऊ शकतात. किती लाचारी करणार? यांना शिवसैनिकांशी काही देणघेणं नाही. मी आणि माझं कुटुंब यापुढे यांना काही दिसत नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.
आमच्यासोबत सर्व धर्माचे लोक येत आहेत : बाळासाहेबांच्या हिंदूत्वाचा गळा गोठला तर चालेल का? बाळासाहेबांनी हिंदूत्वासाठी आपला मतदानाचा हक्क गमावला. मात्र, त्यांनी कधीही माघार घेतली नाही. हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. तरी आमच्यासोबत सर्व धर्माचे लोक येत आहेत. अब्दुल सत्तारही आमच्या मंत्रीमंडळात आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
यांची बांधिलकी पैशांसाठी : रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांचा गळा गोठला. त्यांची बांधिलकी पैशांसाठी होती. त्यांनी शिवसेनेच्या खात्यामधील ५० कोटी रुपये मागितले. बँकेने नकार दिला. आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, आणि ५० कोटी आम्हाला मागता. मी क्षणाचाही विचार न करता पैसे दिले. यांचं प्रेम फक्त पैशांवर, बाळासाहेबांवर नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला.
दसरा मेळावा शिमग्याला घ्या : 'शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून आणण्याचा एमओयू केला. यांनी यावरही संशय घेतला. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडून अफझलखानाचा आदर्श घेतला. यांचा मेळावा नाही, शिमगा आहे. वर्षभर आमच्यावर, मोदींवर टीका करतात. दसरा मेळावा शिमग्याला घ्यायला हवा. मागचं पुढचं सगळं सोडून मुख्यमंत्री बनले. शरद पवारांकडे दोन माणसं पाठवली. यानीच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची शिफारस केली. मुख्यमंत्री व्हायचं होतं, फक्त दाखवायचं नव्हतं', अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.
मी कार्यकर्ता म्हणूनचं काम करतो : 'तुमच्यावर किती केसेस आहेत. तुम्ही किती लाठ्याकाठ्या खाल्ल्या. बाळासाहेब ठाकरे पोलीस स्टेशनमध्येही जायचे. तुम्हाला फक्त घ्यायचं माहित आहे. असा पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात उभं रहावं लागतं. मी मुख्यमंत्री झालो तरी माझ्यात काही बदल झाला नाही. मी कार्यकर्ता म्हणूनचं काम करतो आणि करत राहणार. आजही मी रस्त्यावर उतरून काम करतो. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानींच मुख्यमंत्री व्हावं असा नियम आहे का?' असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गहाण टाकलेली शिवसेना सोडवण्याचं काम केलं : एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मी तुम्हाला सलतोय. गहाण टाकलेली शिवसेना सोडवण्याचं काम मी केलं. मी जी-२० च्या सभेलाही उपस्थित असतो आणि मी गोर-गरिबांच्या वसाहतीत शौचालयाची पाहणी करायलाही जातो. मला कशाचीचं लाज वाटत नाही. मी कधीच माझ्या परिवाराला वेळ दिला नाही. महाराष्ट्र हाच माझा परिवार आहे. कोव्हिडच्या काळात तुम्ही घरी बसून होता, मी पीपीई किट घालून निघालो. तुम्ही त्या काळात खिचडीचा घोटाळा केला, असा हल्लाबोल त्यांनी केला.
हेही वाचा :