मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दे धक्का देत बंड करून देवेंद्र फडवणीस यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या सरकारला आज 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या एक वर्षाच्या कार्यकाळात शिंदे - फडणवीस सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. मात्र तरीही अनेक कारणांनी वर्षभरात हे सरकार चर्चेत राहिलेले आहे. प्रत्येक दिवशी विरोधकांच्या टिकेचा सामना सरकारला करावा लागत आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात सध्या पहाटेच्या शपथविधी वरून शाब्दिक चकमक सुरू आहे. ही शाब्दिक चकमक शिंदे गटाबरोबर भाजपसाठी सुद्धा डोकेदुखी ठरणारी आहे.
एकनाथ शिंदे शिवाय पर्याय नव्हता : एका वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड करून शिंदे आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडले व त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. इतकेच नाही तर अनपेक्षित पणे मुख्यमंत्री पदाची माळ सुद्धा त्यांनी स्वतःच्या गळ्यात घालून घेतली. भाजपकडे जास्त आमदारांचे संख्याबळ असताना सुद्धा व त्यासोबत मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षाचा दांडगा अनुभव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतानाही शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवणे हे भाजपमधीलच अनेक नेत्यांना पटलेले नव्हते. परंतु शिंदे शिवाय पर्याय नाही व इतिहास घडवणाऱ्या शिंदे यांना नाकारूनही चालणार नाही या कारणाने शिंदे - फडवणीस जोडी राज्यात दमदार कामगिरी करू लागली.
आरोप प्रत्यारोपात 1 वर्ष पूर्ण : राज्यात शिंदे - फडवणीस यांचे सरकार हे बेकायदेशीर असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला गेला. या सरकारवर आरोप केल्याशिवाय शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचा दिवसही उजाडत नाही, अशी टीकाही होऊ लागली. सरकार आज, उद्या पडेल, असे म्हणत.. म्हणत या सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. अशातच महाविकास आघाडीला वेठीस धरण्यासही शिंदे - फडणवीस सरकारला यश आले आहे. विशेष म्हणजे करोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांची पूर्ण कोंडी केली आहे. यासोबत उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप येणाऱ्या दिवसात कुठल्या दिशेला जातात हे पाहणे सुद्धा सर्वात महत्त्वाचे असणार आहे. परंतु या आरोप प्रत्यारोपामध्ये शिंदे - फडणवीस सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला हे विशेष.
जाहिरातीवरून युतीत मिठाचा खडा? : शिंदे - फडणवीस सरकारची एक वर्षाची कामगिरी दमदार आहे असे म्हटले तरी सुद्धा त्याला वादाची किनारही आहे. शिंदे गटातील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार व त्यातून उद्भवलेली नाराजी, या सोबतच महाराष्ट्र भूषण समारंभातील दुर्घटना, महामंडळावरील रखडलेल्या नियुक्त्या या मुद्द्याची किनारही शिंदे फडणवीस यांच्या वर्षभराच्या कामगिरीला आहे. परंतु वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून शिंदे फडणवीस सरकारमध्ये मिठाचा खडा पडला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या जाहिरातीमध्ये जास्त महत्त्व देण्यात आल्याने व या जाहिरातीमधून फडणवीस यांचा फोटोही गायब केल्याने भाजप नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.परंतु देवेंद्र फडणवीस यांनीच यामध्ये हस्तक्षेप करत झालेली चूक सावरून घेतल्याने पुढचा अनर्थ टळला गेला. परंतु एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक इशाराच होता.
कल्याणकारी योजनांचा वर्षाव : शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत असताना सरकारने केलेल्या कामाची जंत्रीच जनतेसमोर मांडली गेली आहे. यामध्ये विशेष करून गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र सध्या देशात नंबर एक वर आहे. परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात राज्यात येत असल्याने राज्यातील उद्योगधंद्यांनाही चालना भेटली आहे. परंतु राज्यात येणारे फॉक्सकॉन एअरबस सारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिंदे - फडणवीस सरकारला टीकेला सामोरे जावे लागले. समृद्धी महामार्गाची निर्मिती त्याचबरोबर राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची कामे आणि कल्याणकारी योजनांचा वर्षाव शिंदे - फडणवीस सरकारकडून सुरू आहे.
मूलभूत प्रश्नावरून लक्ष भरकटवण्याचे काम : महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी असून जनमानस आपल्या सोबत असल्याचे वारंवार शिंदे - फडवणीस यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तशा पद्धतीच्या जाहिराती वर्तमानपत्रातून देण्यात येत आहेत. परंतु सध्याच्या घडीला राज्यात निवडणुका झाल्यास शिंदे - फडणवीस सरकारला पराभवाला समोर जाऊ लागेल अशा पद्धतीचा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आला आहे. म्हणूनच आतापर्यंत दीड ते दोन वर्ष वर्षाचा अवधी जास्त झाला तरी अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. राज्यातील विकास खुंटला आहे. फक्त घोषणाबाजी सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विविध काम प्रलंबित असून मंत्र्यांवर ही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. राज्यातील जनतेचे लक्ष मूलभूत प्रश्न महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विकास या मुद्द्यांवरून इतरत्र भरकटवण्याचे प्रयत्न शिंदे - फडणवीस सरकारकडून केले जात आहेत. जनतेला हवा असलेला विकास न करता धार्मिक मुद्दे उपस्थित करून शहरांची नावे बदलणे, चित्रपटावर वाद निर्माण करणे अशा पद्धतीने राजकारण सुरू आहे. या सर्व घडामोडीत जनतेचे मात्र हाल होत आहेत.
जागा वाटपावरून वादाची चिन्हे : शिंदे फडवणीस सरकारने एक वर्ष पूर्ण केले, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी सुद्धा येणार वर्ष हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहे. या दरम्यान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दोघांचाही कस लागणार आहे. विशेष करून जागा वाटपावरून शिंदे - फडणवीस यांच्यामध्ये वाद होण्याची चिन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. यह दोस्ती टुटेगी नही, फेविकॉल का मजबूत जोड है! असे शिंदे आणि फडणवीसांनी ठामपणे सांगितले असले तरी सुद्धा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची महत्त्वकांक्षा ठेवणारा भाजप एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत किती जागा देतो हे बघणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. व ते खुद्द देवेंद्र फडवणीस यांनीचं नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मान्य केले आहे. अशा परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मागील निवडणुकीत भाजपने जितक्या जागा दिल्या होत्या त्या जागांवर कुठल्याही परिस्थितीमध्ये हक्क सांगण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या जागा त्यांना भेटल्या नाहीत तर नक्कीच त्यावरून वाद निर्माण होईल. अशा परिस्थितीत शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना, नगरसेवकांना व नेत्यांनाही शिंदेंची साथ कायमस्वरूपी देणे शक्य आहे की नाही? हे आता सांगणे कठीण आहे.
हेही वाचा -
- Eknath Shinde Delhi Visit: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत अमित शाह यांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर झाली चर्चा
- Fadnavis On CM Post : पुढील मुख्यमंत्री शिंदे नसणार?, फडणवीसांच्या विधानामुळे तर्कांना उधाण
- Balasaheb Thorat on Loksabha Election : महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू-बाळासाहेब थोरात