मुंबई - महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामुळे एका शिक्षकाचा बळी गेला असल्याचा आरोप आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने केला आहे. जगदीश चौधरी हे मुक्ताबाई पालिका रुग्णालय कोविड सेंटर, घाटकोपर येथे कर्तव्यावर होते. त्यांची तब्येत बरी नसताना आणि वैद्यकीय उपचाराची फाइल दाखवूनही त्यांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले आणि कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप लोकभारतीकडून करण्यात आले आहे.
शारीरिक शिक्षण शिक्षक असणारे जगदीश चौधरी हे एन वॉर्डमधील बर्वेनगर येथील शाळेत शिकवत होते. उपचारासाठी कार्यमुक्त करा, अशी विनंती ते सातत्याने करत होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले नाही. जगदीश चौधरी कामावर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या उपचाराबाबतची कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांना दाखवली होती. त्यांनी ती न पाहता त्यांना काम करण्यास भाग पाडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या पत्नी, मुलीलाही कोरोना झाला आहे. ते भिवंडी येथे क्वारंटाइन सेंटर येथे उपचार घेत आहेत.
शिक्षक भारतीने पालिका आयुक्तांकडे खालील मागण्या केल्या आहेत.
1) मुंबई महानगरपालिकेने चौधरी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची तात्काळ मदत करावी.
2) चौधरी यांच्या कुटुंबातील एका व्यकतीला शासकीय नोकरीत सामावून घेतले पाहिजे.
3) चौधरी यांचा बळी घेण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी.
4) कोरोनासाठीच्या कामावर असलेले व सध्या पॉझिटिव्ह असलेले सर्व कर्मचारी यांना महापालिकेच्या माध्यमातून उपचार द्यावेत, तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या शिक्षकांना त्याची वैद्यकीय परिपूर्ती करण्यात यावी.
5) शिक्षण विभागाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविडच्या कामातून कार्यमुक्त करावे.
6) ऑनलाइन शिकवण्याचे काम सर्व मुख्याध्यापक, शिक्षक करत असूनही केवळ त्रास देण्यासाठी दररोज 4-4 लिंक भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. ह्या सर्व प्रकाराची चौकशी करून मुख्याध्यापक, शिक्षकांना मानसिक ताणातून मुक्त करावे.
हेही वाचा - ...अन्यथा १ हजार रुपये दंड भरा, मुंबई महापालिकेचा इशारा