मुंबई - पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन शनिवारी मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर म्हणाले की, हे नवीन रुग्णालय तयार झाल्यानंतर मुंबईतील सायन, केईम, नायर या पालिकेच्या रुग्णालयावरील ताण कमी होऊन मुंबईतील सर्वांना रुग्णालयाच्या चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील.
शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी पालिकेच्या ताब्यातील रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही नवीन 8 मजली वास्तू उभी राहणार आहे. या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी प्राप्त झाली असून पूर्व उपनगरांमध्ये पायाभूत व उत्तम आरोग्य सुविधा पालिकेतर्फे देण्यात येणार असल्याचे यावेळी महापौर म्हणाले. नवीन रुग्णालय तयार झाल्यानंतर येथे येणाऱ्या गोवंडी, बेंगनवाडी, शिवाजी नगर, मानखुर्द चित्ता कँप, पांजरापोळ, वाशी नाका, माहुल गाव लाल डोंगर, पी एल लोखंडे मार्ग, घाटले गाव येथील साधारणपणे 25 ते 30 लाख लोकसंख्येच्या रुग्णांना उपचार करण्यासाठी मदत होणार आहे.
हेही वाचा - शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे श्रेय घेण्यासाठी भाजप-शिवसेनेत बॅनरबाजी
या उच्च दर्जाच्या रुग्णालयात 580 खाटा व अतिविशेष सेवा असणार आहेत. हे सर्व बांधकाम मुंबई महानगरपालिका करणार असून रुग्णालय तयार झाल्यानंतर पूर्व उपनगरातही चांगल्या दर्जाचे रुग्णालय तयार होणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही असे महापौर म्हणाले. नवीन इमारतीचे आरेखन वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केले आहे तर इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट व निविदा प्रक्रियेद्वारे मे ग्लोबलायझेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना प्रदान करण्यात आले आहे.
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार राहुल शेवाळे स्थानिक, आमदार तुकाराम काते, स्थानिक नगरसेविका समृद्धी काते, नगरसेवक विट्टल लोकरे व इतर नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - मुंबईतील सायन स्टेशनच्या बाहेर संशयास्पद बॅग आढळल्याने भीतीचे वातावरण