मुंबई - महाआघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण वाढीव वीज बिलासंदर्भात त्यांना निवेदन देऊनही आघाडी सरकारच्या वर्तणुकीत काहीही फरक पडलेला नाही. ग्राहकांवरचा वाढीव वीज बिलांचा बोजा कमी झालेला नाही, अशी सडेतोड टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपालांना भेटायला गेल्यावर राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शरद पवारांना अनेकांनी वीज बिले माफ करण्याची आणि वाढीव वीज बिले कमी करण्याची मागणी करणारी अनेक निवेदने दिली होती. परंतु त्यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही. याचा अर्थ शरद पवारांच्या शब्दाला महाआघाडी सरकारमध्ये किंमत उरलेली नाही असाच होतो अशी टीका मनसे नेते बाळानांदगावकर यांनी केली आहे.
तर राज्यभरात जन आंदोलन-
राज्यात सध्या वीजबिल सवलतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यात आता या मुद्यावरून सुरू असलेल्या राजकारणात मनसेनेही उडी घेतली आहे. वीजबिल माफी देता येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकारने सोमवारपर्यंत बील माफ करावे, अन्यथा राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.
तरीही सरकार ढिम्मच-
लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिला संदर्भातील सवलतीवरून उर्जा मंत्रालयाने घुमाजाव केले आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यातच मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत निवेदन, अर्ज बैठका, विनवण्या हे सगळे उपाय करुन झाले. तरीही सरकार ढिम्म आहे. त्यामुळे आता जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण, “लाथो के भूत बातों से नही मानते”, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज ठाकरे देतील पुढील आदेश-
वीज बिल मुद्यावरून आंदोलन छेडणार असून, आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातले नेते, सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले असून राजगडावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची काय दिशा असेल हे ठरवले जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील, तसे पुढचे आंदोलन असणार आहे, असे मनसेचे नेते संदीप देशपाडे यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत निवेदन, अर्ज बैठका, विनवण्या हे सगळे उपाय करुन झाले. तरीही सरकार ढिम्म आहे. त्यामुळे आता जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल.