मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, असे तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का, अफवांवर विश्वास ठेवू नका ? शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरी होते. त्यामुळे ते बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे दावा संजय राऊत यांनी केला.
सरकार पाच वर्षे चालेल -
शरद पवार हे काही दिवस आजारी होते त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच शरद पवार यांचा या सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल असे राऊत यांनी सांगितले.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. तसेच या बैठकीत मराठा आरक्षणाचा पेच, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे राज्यापुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयांवरही चर्चा झाली.
हेही वाचा - शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्याच्या परिस्थितीवर चर्चा
हेही वाचा - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोना मुक्तीकडे, फक्त ३ नव्या रुग्णांची नोंद