पुणे/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने जाहीरपणे, तर शिवसेनेच्या वतीने अप्रत्यक्षपणे करण्यात आले होते. मात्र तरीही शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलीच.
शरद पवारांच्या उपस्थितीचे कारण? : शरद पवार हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले, याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 'शरद पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत. ते साहित्य, संस्कृती आणि क्रीडा या तीनही क्षेत्रात लीलया वावर करतात. यासह त्यांचे पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्राशी देखील जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकडे केवळ राजकीयदृष्ट्या पाहू नये. शरद पवारांची उपस्थिती सांस्कृतिकदृष्ट्या देखील तितकीच महत्त्वाची आहे', असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
मोदींचे पवार प्रेम : टिळक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात हातात घेतला होता. तसेच शरद पवारांनी देखील मोदींच्या पाठीवर हलकेच थोपटल्याचे पाहायला मिळाले. दोघेही नेते एकमेकांशी खळखळून हसून बोलताना दिसले. त्यानंतर पंतप्रधानांनी अजित पवार यांच्याशी हस्तांदोलन केले व त्यांच्या दंडावर हलकेच थोपटले. अन्य नेत्यांच्या तुलनेत, शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी मोदींचे प्रेम अधिक दिसले अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पवारांनी साधला समतोल : शरद पवार यांचे राजकारण लवकर कोणालाच कळत नाही. ते आज एखादी कृती करतात, आणि त्याचे संदर्भ काही दिवसानंतर लागतात, असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांचे मत आहे. शरद पवार हे 'इंडिया' च्या आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. असे असतानाही त्यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे म्हणजे समतोल साधण्याची कृती आहे, असे ते म्हणाले.
अजित पवार महत्वाचे : नरेंद्र मोदी आणि भाजप यांना काहीही करून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. त्या दृष्टीने त्यांची पेरणी सुरू आहे. म्हणूनच अजित पवार हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कदाचित विधानसभेत अजित पवार भाजपसोबत दिसणार नाहीत, मात्र लोकसभेपर्यंत तरी भाजप अजित पवार यांचा निश्चितच वापर करून घेणार. त्या दृष्टीने शरद पवार यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. म्हणूनच शरद पवार हे सध्या तरी समतोल साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया भावसार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :