मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहे. याचा पक्ष म्हणून निश्चित विचार करावा लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्याबाबतची तक्रारही तिने दाखल केली आहे. त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
मुंडेंनी सर्व माहिती दिल्याची पवारांची माहिती -
धनंजय मुंडे बुधवारी आपल्याला भेटले होते, असे पवार यांनी सांगितले. त्यात त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांचे एका महिलेबरोबर संबध होते. त्यातून काही तक्रारी झाल्या. त्या बाबत सध्या चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी ते आधीच उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत माहिती त्यांनी दिल्याचे पवार म्हणाले.
मुंडेंवरील आरोप गंभीर -
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. याचा विचार पक्ष म्हणून करावा लागेल, असे पवार म्हणाले. या विषयी पक्षाच्या सहकार्यांबरोबर चर्चा झालेली नाही. या सर्वांना विश्वासात घेणार आहे. तसेच मुंडे यांनी दिलेली माहिती सविस्तरपणे मांडणार असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर सर्व समहमतीने आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष म्हणून आणि पक्ष प्रमुख म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल, तो तातडीने घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.
मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही -
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंडे यांनी आरोप झाल्यानंतर राजीनामा पवारांकडे दिल्याचे वृत्त होते. मात्र, ही माहिती माझासाठी नवीन असून, असे काही झाले नसल्याचे पवार म्हणाले.
पोलिसांनी रेणू शर्मा यांना माध्यमांशी टाळत मागील दाराने बाहेर काढले -
पोलिसांनी रेणू शर्मा यांना माध्यमांशी टाळत मागील दाराने बाहेर काढले. आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत, तक्रारदाराचे अर्धेच म्हणणे (स्टेटमेंट) दाखल करून घेतले असून उद्या 11 वाजता पुन्हा म्हणणे दाखल करण्यासाठी बोलावले आहे. या प्रकरणाला ४ दिवस होऊनही अद्याप पोलिसांनी प्राथमिक तक्रार (एफआयआर) दाखल करून घेतलेली नाही. याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात तक्रारदार यांच्यावर दबाव टाकत आहेत, असे रेणु शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.
रेणू विरुद्ध खोट्या केस केल्या जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस मागे घ्यायला सांग, नाही तर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू असे धंनजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावले, असल्याचेही वकिलांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जातेय पाठराखण
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप हे गंभीर आहेत, परंतु यासंदर्भात पोलीस चौकशीत जे काही स्पष्ट होईल, त्यानंतरच मुंडे यांच्यावरील कारवाईचा विषय समोर येईल. मात्र, केवळ आरोप केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यास नकार दिला आहे. यामुळे तूर्तास मुंडे यांना अभय मिळणार असून पक्षाकडूनही पाठराखण केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील दोन दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या विषयावर चर्चेत आलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास पक्षाकडून अभय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाकडून केली जाणार नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री बंगले लपवतात, त्यांचे मंत्री महिलांशी असलेल संबंध लपवतात - सोमैय्या
निवडणूक आयोगाकडे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी जाऊन तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणातील आरोप करणारी पीडित महिलाही सोमैय्या यांच्यासोबत डी. एन. नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात दाखल झाली होती. सदरच्या पीडित महिलेने आरोप केलेला आहे की, 2003 पासून धनंजय मुंडेंनी शारीरिक संबंध ठेवले आहेत. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बॉलिवूडमध्ये चित्रपटात गायक होण्यासाठी मदत करू, असे आश्वासन सुद्धा धनंजय मुंडे यांनी पीडित महिलेला दिला असल्याचा दावा या महिलेने केलेला आहे.
शरद पवार आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो अंतिम असेल
आपल्या विरोधात सध्याचे प्रकरण सुरू आहे. त्यासंदर्भात मी कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यासाठीची सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. त्यामुळे माझ्या या प्रकरणात पवार साहेब आणि पक्ष जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत केला. मागील दोन दिवसांपासून मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचारासंदर्भात वाद सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. बॅलार्ड पियर येथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनता दरबारला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण निर्दोष असून आपल्यावर जाणीवपूर्वक फसवणूक केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विषयावर पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयासंदर्भात दीर्घ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुंडे यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच त्याविषयी पक्षाकडून आज सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. मुंडे यांचे प्रकरण गंभीर असल्याचे वक्तव्य सकाळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनण्याची शक्यताही एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मुंडे यांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा राहणार असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली
नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही -
नवाब मलिकांवर कोणत्याही स्वरुपाचे वैयक्तिक आरोप नाहीत. त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई झाली आहे. त्याचा थेट संबध मलिकांबरोबर लावण्यात काही अर्थ नाही. मात्र, संबधित तपास यंत्रणेने सत्य काय आहे, ते समोर आणावे. त्यासाठी चौकशी यंत्रणेला सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्याबाबतच्या चर्चांना पवारांनी एक प्रकारे पूर्णविराम दिला आहे. नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे.