मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना विषाणूसह एनपीआर, सीएए, एनआरसीवर चर्चा करण्यात आली. दोन दिवसानंतर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना विषाणू संदर्भात प्रबोधन आणि जनजागृती करण्याची आपली जबाबदारी पार पाडावी, असे आदेश पवारांनी आमदार आणि मंत्र्यांना दिले. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, या बैठकीत एनपीआर,सिएए,एनआरसीवर चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाची जी भूमिका ठरली आहे, त्यावर पवारांनी आमदारांना सविस्तर माहिती दिली. तसेच यासाठी सरकारने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून त्याची माहिती सरकारकडे जाईल, आणि भविष्यात त्यावर सरकार पुढे निर्णय घेईल, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली.
एनपीआर, एनआरसीवर बाबतीत राज्यातील जनतेच्या मनात शंका आहेत, एक प्रकारची भीती आहे, ती दूर करण्याची सरकारची आणि आमची जबाबदारी आहे, कोणत्याही जनतेवर अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे. याची काळजीही सरकार घेईल. त्यामुळे यासाठी पक्षाने जे धोरण ठरवले आहे. त्यावर सरकार निर्णय घेईल, अशी माहिती मलिक यांनी दिली. तसेच या बैठकीत कोरोनाला टाळण्यासाठी आमदारांनी प्रबोधन, सभा आणि बैठका घेऊन त्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले असल्याचेही मलिक म्हणाले.