मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधानभवनात आले होते. त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या बैठका सुरू असल्याने सेना-राष्ट्रवादी -काँग्रेस ही नवीन आघाडी राज्यात सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे 54 आमदार आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून ओळखले जाऊ शकतात.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी किमान समान कार्यक्रमाचा झांगडगुत्ता?
विधान भवनाबाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सदस्यांच्या आग्रहास्तव पवारांनी सर्वांसमवेत एक छायाचित्र काढले. आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात आले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ट्विस्ट निर्माण करणाऱ्या घडामोडी घडल्यानंतर मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मुख्यमंत्री पदावरून सत्ता स्थापनेचा निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. त्यानंतर शिवसेनेने आघाडीसोबत सूत जुळवून सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र- आघाडीच्या पाठिंब्याचे पत्र त्यांना मिळाले नाही. मंगळवारीही राष्ट्रवादी-काँग्रेस- शिवसेनेच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आजही सर्वच राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
हेही वाचा - 'काँग्रेस, राष्ट्रवादीचे अद्याप ठरलेले नाही, विचारधारेनुसारच पुढचा निर्णय'