मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी पवारांनी फडणवीसांसोबत राज्यात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेसंदर्भात उपाय योजना आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशाबाबत चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेचच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर रवाना झाले होते. पवारांचा दौरा पूर्ण होण्या आधीच राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले. त्यामुळे पवार यांनी पुढचा दौरा केला नाही. मात्र दुष्काळी उपाययोजनाबाबत मुख्यमंत्रांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले होते. त्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आयोगाकडे केली होती.
या भेटीत शरद पवारांनी फळबाग,छावण्या,दुष्काळी भागातील नागरिकांचा रोजगार ,योग्य पाणी नियोजन, अन्यधान्य नियोजन ,जायकवाडी धरणातील पाणी साठा या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
या चर्चेदरम्यान पवारांनी मांडलेले मुद्दे
१. छावणी चारा अनुदान केवळ ९० रुपये दिले जाते ते १९० करावे,
२. केवळ ऊसाचे वाडे न देता इतर हिरवा चारा ही द्यावा
३. फळबागा जाळून चालल्या आहेत.फळबाग जळणे म्हणजे शेतकरी २५ वर्ष मागे गेल्या सारखेच असल्याने त्या दृष्टीने मदत करावी.
४. आघाडी सरकार प्रमाणेच प्रति हेक्टर ३५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी .
५. २०११ च्या जनगणनेनुसार पाणी दिले जात आहे, यात बदल करून सर्वसमावेशक धोरण अवलंबवावे.
६. चार छावण्या सुरू झाल्या पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना योग्य निधी दिला जात नाही याकडे लक्ष द्यावे.
७. पीक विमा तसेच विमा फळबाग योजना विम्याचे पैसे त्वरित द्यावेत.
८. जायकवाडी धणारचे पाणी मराठवाड्याला देण्यात यावे..
दरम्यान राज्यातील दुष्काळी गावांचा नुकताच आढावा घेतला असून आवश्यक ती मदत दिली जात आहे. प्रत्येक जनावरांच्या चाऱ्याच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसात अधिक गतीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले. या बैठकीला राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राणाजगजीत सिंह पाटील, दीपक आबा साळुंखे आणि राजेश टोपे उपस्तिथ होते.