मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्व क्षेत्रावर दुष्परिणाम जाणवत आहेत. अनेकांचे उद्योगधंदे या कोरोनामुळे बंद झालेत. मुंबईची ओळख असणारे मुंबईचा डबेवाला यांचा व्यवसायही या कोरोनामुळे बंद झाला होता. व्यवसाय बंद झाल्यामुळे डबेवाल्यांच्या सायकली कित्येक महिने एकाच जागी उभ्या असल्याने त्या सायकलींची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या डबेवाल्यांना मदत म्हणून शरद पवार यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाबाबतची माहिती खुद्द शरद पवार यांनी ट्विट करून दिली आहे. कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या पुढाकाराने व संघटनेचे प्रमुख उल्हास मुके यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.
शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा -
मुंबईच्या डबेवाल्यांची संघटनेच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारतात येऊन ज्यांचे कौतुक केले त्या संघटनेच्या डबेवाल्यांकरीता मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला असल्याचे शरद पवारांनी ट्विट केले आहे. सुमारे दोन लाख नोकरदार, कामगार यांना डबा पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत आहे. वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव ह्या गुणांचा मिलाप असणाऱ्या संघटनेकडून खूप काही शिकायला मिळते. शतकाहून अधिक काळाच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या संघटनेची बदलत्या काळातही वृद्धी आणि समृद्धी होत राहो याकरीता डबेवाला संघटनेला माझ्या हार्दिक शुभेच्छा शरद पवार यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा - मुंबईत काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट