मुंबई- 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झालाय. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत मदतीसाठी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेय आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ ओसरेपर्यंत नागरिकांनी घरी किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार केले.