मुंबई - शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार धनंजय शिंदे यांचा दारुण पराभव केला. निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केले. पवार यांना २९ तर शिंदे यांना केवळ २ मते मिळाली आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यकारी मंडळातील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन पदासाठीची निवडणूक रविवारी, २४ ऑक्टोबर रोजी नायगाव येथील संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात पार पडली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर उपाध्यक्षपदासाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. मात्र, दोन्ही पदाची निवडणूक एकतर्फी होऊन शरद पवारांसह उपाध्यक्ष पदासाठीचे सात दिग्गज नेते निवडून आले आहेत. यामुळे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार राहणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असेल.
दरम्यान निवडणूक कोणत्या नियमाखाली घेतली जात आहे, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करीत आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरली होती.
हेही वाचा - लसीकरणात भारत खूप मागे, हीच गती राहिल्यास पुढचे वर्षही यातच जाणार - पृथ्वीराज चव्हाण
लोकशाहीला फाटा -
आपचे उमेदवार धनंजय शिंदे यांनी या निवडणूक कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. आजची लोकशाही मार्गाने झालेली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आम्ही गाऱ्हाणे मांडले होते. तरीही निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिंदे म्हणाले. तर निवडणूक लोकशाही मार्गानेच झाली, असा दावा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांनी केला. न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
विजयी उमेदवार - (अध्यक्ष पदासाठी)
उमेदवार - मते
१) शरद पवार - २९
विजयी उमेदवार ( उपाध्यक्ष पदासाठी) -
१) विद्या चव्हाण - २९
२) प्रभाकर नारकर - २९
३) प्रभू राशी -२९
४) अरविंद सावंत - २९
५) प्रदीप कर्णिक - २८
६) अमला नेवाळकर - २८
७) डॉ. भालचंद्र मुणगेकर - २८