मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक बंदुकधारी इतर वाहनांना बंदुकीचा धाक दाखवत होता. या बंदुकधारी व्यक्तीच्या वाहनावर शिवसेनेचा लोगो होता. याबाबतचा व्हिडिओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला होता. यावरुन शिवसेनेवर टीका झाली होती. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले शिवसैनिक नव्हते, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या मतदार संघात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
नेमके काय आहे प्रकरण -
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात, वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहेत. रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांच्या कारवर शिवसेनेचा लोगो होता. हा लोगोच सर्वकाही सांगत असल्याची बाब जलील यांनी ट्विटमधून अधोरेखित केली. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक या घटनेची दखल घेणार का? असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत उपस्थित केला होता.
संबंधित यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावले उचलत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म ऍक्ट 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास गजानन कांबळे, विजय प्रकाश, सिताराम मिश्रा, राम मनोज यादव या चौघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ते शिवसैनिक नाहीत -
रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचेही शंभुराज म्हणाले.
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर पिस्तूल दाखवत प्रवास करणारा चौकशीकरिता हजर
हेही वाचा - 'या' वेळेत लोकल प्रवास केल्यास होणार कारवाई