मुंबई Shambhuraj Desai Notice: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ससाठा प्रकरणात आरोपी ललित पाटील याला कोणी मदत केली असा प्रश्न उपस्थित करताना या प्रकरणात दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांची नावे घेतली होती. यानंतर आपण सुषमा अंधारे यांना 24 तासांची मुदत दिली होती; मात्र या 24 तासात त्यांनी कुठल्याही पद्धतीची माफी मागितली नाही अथवा आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली नाही. त्यामुळे आता आपण वकिलामार्फत या प्रकरणी कायदेशीर नोटीस सुषमा अंधारे यांना पाठवली आहे. जर या नोटिशीला त्यांनी रीतसर उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर वकिलांच्या सल्ल्यानुसार अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
तपासानंतर बोलणाऱ्यांची तोंडे बंद होतील: ड्रग साठा प्रकरण आणि आरोपी ललित पाटील प्रकरणात सर्व बाबी तपासल्या जात आहेत. आरोपीचे रेकॉर्ड तपासले जातील. यामधील अनेक धागेदोरे पोलिसांना सापडले आहेत. याबाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या तपासानंतर जे बोलणारे आहेत त्यांची तोंडे नक्कीच बंद होतील असेही देसाई म्हणाले. संशयितांची नार्को टेस्ट करा, अशी सुषमा अंधारे यांनी मागणी केली आहे. मात्र, माझी कोणत्याही यंत्रणेसमोर कितीही वेळा जाण्याची तयारी आहे असेही देसाई म्हणाले. यापूर्वी विनायक राऊत यांनीही असाच तथ्यहीन आरोप करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांनी नंतर आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले. यावरून तरी अंधारे यांनी बोध घ्यावा असेही देसाई यांनी सुनावले.
आदित्य ठाकरे का घाबरले? दिशा सालीयान प्रकरणांमध्ये आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता शंभूराज देसाई म्हणाले की ज्या माणसाने काहीही केलेले नाही त्याने कोर्टात आधीच धाव घ्यायची काय गरज आहे. आदित्य ठाकरे नेमके कशाला घाबरले आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. याबाबत पत्रकारांनी त्यांच्याकडून नेमका खुलासा मागून घ्यावा; मात्र या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्याकडे अधिक माहिती आहे. त्यांच्याकडून ती घेतल्यानंतर आपण ती प्रसारमाध्यमांसमोर देऊ शकू असेही देसाई म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील: दरम्यान मराठा आरक्षण मिळावे यासाठी एका मराठा आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. न्यायालयामध्ये टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी आता 'क्युरेटिव्हिटीशन' दाखल केली असून पंधरा दिवसात ती बोर्डावर येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी पुन्हा संधी आहे. त्यामुळे मराठा समाजाने संयम राखावा असेही ते म्हणाले.
शरद पवार यांचे वक्तव्य चुकीचे: भारत देश हा नेहमीच दहशतवाद विरोधात भूमिका घेतलेला देश आहे. अशा वेळेस शरद पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. देशाने इस्राईलच्या बाजूने भूमिका घेतली असताना शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेणे हे योग्य नसल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले.
हेही वाचा:
- Shushma Andhare : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा अनिल जयसिंघानिया केला जाईल का? सुषमा अंधारेंचा सवाल
- Sushma Andhare On CM Shinde : एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कधीही जाणार, भाजपचा काही नेम नाही : सुषमा अंधारे
- Shambhuraj Desai On Sushma Andhare : ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा...- शंभूराज देसाई