मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा आणि धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या आरोपीला मुंबईतील सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका केली आहे. शैलेश शिंदे असे जामीन मंजुर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
म्हणून केला धमकीचा ई-मेल
आपल्या जुळ्या मुलांना शाळा त्रास देते, यावर न्याय मिळावा म्हणून अनेकदा ई-मेल केले. मात्र त्याचे उत्तर न आल्याने धमकीचा ई-मेल केल्याची कबूली आरोपी शैलेश शिंदेने दिली.
काय आहे प्रकरण?
ई-मेलद्वारे मुंबईतील मंत्रालयात बॉम्बस्फोट करण्यासाठी बनावट धमक्या पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदेला अटक करण्यात आली होती. त्याला पुण्याच्या घोरपडी भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील आरोपीची पुढील चौकशी करत आहेत.
सचिवालयातही बॉम्ब ठेवल्याची अफवा
गेल्या महिन्यातही महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयात एक बॉम्ब ठेवल्याची माहिती एका व्यक्तीने दिली होती. तपासणीनंतर ती केवळ अफवा असल्याचे दिसून आले. या प्रकरणात बनावट माहिती देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सागर मांधरे असे त्या आरोपीचे नाव आहे. तो नागपूर येथील शेतकरी असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा - डेल्टा प्लस विषाणूने घेतला राज्यातील पहिला बळी