मुंबई - घाटकोपरमध्ये 10 वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या एका नराधमास घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सचिन अनंत शामा (35) असे या नराधमाचे नाव आहे. तो काजूटेकडी घाटकोपर येथे राहत असून त्यानी आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घाटकोपरच्या पारशीवाडी परिसरात 17 आगस्ट रोजी एक 10 वर्षाची मुलगी रात्री डान्स क्लास वरून घरी परतत होती. दरम्यान सदर आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावले. नंतर तिच्याशी ओळख वाढवून तिला जवळच्या जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या बाजूला असलेल्या एका निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. यावेळी, मुलीने जोरात आरडाओरडा सुरू केल्याने या नराधमाने त्या ठिकाणाहून पळ काढला. नंतर घाबरलेल्या अवस्थेत ही मुलगी घरी परतली, २ दिवसानंतर मुलीने झालेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी त्वरित घाटकोपर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली
या प्रकरणी पोलिसांनी मुलीनी दिलेल्या माहितीवरून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये सारख्या २ व्यक्तींचे काही फुटेज मिळाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता परिसरातील एका व्यक्तीने आरोपी सचिनला ओळखले आणि त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. गुरुवारी सकाळी सचिनला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.