मुंबई - ठाणे रेल्वे स्थानकात पर्यावरणाच्या रक्षणासाठी नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे वसाहत, कार्यालये, रुग्णालय आणि अन्य संस्थांमधून दररोज निर्माण होणाऱ्या ४५ किलोलिटर सांडपाण्यावर या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. भारतीय रेल्वेच्या पर्यावरण जतनाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे प्रतिपादन मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक अमरेंद्र सिंग यांनी केले आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (मुंबई विभाग) अमरेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच हा प्रकल्प स्थापित करणारी कंपनी मेयर ऑरगॅनिक्सचे संचालक राजेश तावडे आणि उमा कालेकर यांची उपस्थिती होती. यावेळी अमरेंद्र सिंग बोलत होते.
पर्यावरण जतनाच्या दिशेने पाऊल प्रकल्पाचे उद्घाटन करताना मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक अमरेंद्र सिंग म्हणाले, हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या पर्यावरण जतनाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. हा प्रकल्प ठाणे मध्य रेल्वे संकुलाला शून्य कचरा, शून्य सांडपाण्याची सुविधा निर्माण करेल. या संकुलामुळे ठाणे महापालिकेच्या आधीच ताणलेल्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांवरील भार हलका होईल. शिवाय महापालिकेच्या पाण्याचा वापर देखील ६० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यात भर म्हणजे आमच्या बागेत आणि निवासी वसाहतींमध्ये वापरण्यासाठी दर महिन्याला अंदाजे १०० किलो कंपोस्ट खत तयार केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाण्याची बचत होईल ठाणे रेल्वेस्थानक संकुलातून मिळविलेले ४० केएलडी पुनर्वापरयोग्य पाणी बागकाम, प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डबे धुण्यासाठी, स्वच्छतागृहांमध्ये वापरले जाईल. या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होईल. प्रकल्पातून तयार होणारे कंपोस्ट खत रेल्वेच्या बागा आणि नर्सरीमध्ये वापरले जाईल. पॅकबंद करून ते रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या परस बागांमध्ये वापरण्यासाठीही उपलब्ध करून दिले जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर मेयर ऑरगॅनिक्सने त्याच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी उपक्रमांतर्गत तयार केलेला, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एमबीबीआर) अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाण्यावर प्रक्रिया करेल. हे तंत्रज्ञान लाखो बॅक्टेरिया असलेल्या बायो-फिल्म्सच्या हजारो थरांचा वापर करून सांडपाण्याला स्वच्छ वापरण्यायोग्य पाण्यात आणि समृद्ध कंपोस्ट खतामध्ये रूपांतरित करेल. मेयर ऑरगॅनिक्स ही ब्रिटनमधील अग्रगण्य पोषण आहार अर्थात न्यूट्रास्युटिकल्स कंपनी असणाऱ्या व्हिटाबायोटिक्सची एक शाखा आहे असे मेयर ऑरगॅनिकसचे संचालक राजेश तावडे यांनी यावेळी सांगितले.